शेतीला आता आठ तास वीज (File Photo)
सोलापूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय जाहीर करत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आजपासून शेतीसाठी दररोज आठ तास वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली. यासोबतच, बहुप्रतीक्षित सोलापूर-मुंबई विमानसेवा 2 ऑगस्टपासून पुन्हा सुरू होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
शेतीसाठी वीजपुरवठा वाढविण्याची शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन शासनाने हा निर्णय घेतला आहे. आजपासून जिल्ह्यातील कृषी पंपांना नियमित आठ तास वीज उपलब्ध होणार असून, त्यामुळे पिकांना वेळेवर पाणी देणे शक्य होणार आहे. यापूर्वी अल निनोच्या परिणामामुळे वीजपुरवठा प्रथम दोन तासांवर आणि नंतर पाच तासांवर मर्यादित करण्यात आला होता.
शामगावला दूध भेसळीवरील अन्न सुरक्षा विभागाची कारवाई, भेसळयुक्त दूध तयार करणारे दाम्पत्य अटकेत
सोलापूरकरांसाठी आणखी एक महत्त्वाची घोषणा करत पालकमंत्री गोरे यांनी सांगितले की, २ ऑगस्टपासून सोलापूर–मुंबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार आहे. या निर्णयामुळे उद्योग, व्यापार, शिक्षण आणि वैद्यकीय सेवांसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.
शहरातील बहुप्रतीक्षित उड्डाणपूल प्रकल्पातील अडथळेही दूर झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आवश्यक शासकीय जागा जिल्हाधिकाऱ्यांकडून महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आल्याने प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. तसेच, होटगी येथील आयटी पार्क प्रकल्पासाठी जलसंपदा विभागाची जागा एमआयडीसीकडे विनामोबदला हस्तांतरित करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
महापालिकेच्या कामकाजाबाबत बोलताना गोरे म्हणाले, “महापालिका ही जनतेची संस्था आहे. विकासकामांमध्ये कोणताही भ्रष्टाचार होऊ दिला जाणार नाही. नाला सफाईच्या कामातही कोणतीही गडबड झालेली नाही.”
भैय्या चौक रेल्वे पुलावर दोन दिवसांत बैठक
भैय्या चौक येथील रेल्वे पुलाचे काम संथ गतीने सुरू असल्याबाबत विचारले असता, रेल्वे प्रशासन व संबंधित विभागासोबत पुढील दोन दिवसांत बैठक घेऊन कामाला गती देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे पालकमंत्री गोरे यांनी सांगितले.
वारी ठरली स्वच्छतेची वारी
यंदाच्या आषाढी वारीत प्रशासनाने सेवाभावाने काम करत स्वच्छतेला प्राधान्य दिले. रोगराईचा प्रसार होऊ नये यासाठी प्रभावी नियोजन करण्यात आले असून, यंदाची वारी ही “स्वच्छतेची वारी” ठरल्याचे पालकमंत्री गोरे यांनी नमूद केले.
कुंभमेळ्यातही सेवेसाठी तत्पर
नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यात कार्यकर्त्यांना सेवा करण्याची संधी मिळाल्यास ती आनंदाने स्वीकारू, अशी भावना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केली.






