दीपक गायकवाड, मोखाडा: मोखाडा तालुक्यात यंदा पावसाने अक्षरशः दांडी मारल्याने शेतकरी प्रचंड संकटात सापडले आहेत. पावसावर अवलंबून असलेल्या हंगामी शेतीवर जगणाऱ्या या भागातील शेतकऱ्यांना संततधार पावसाची प्रतीक्षा आहे. मात्र हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांत पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नागली, वरई आणि हळवी या मुख्य पिकांची आवणी पूर्णपणे खोळंबली असून, उभी पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत.
मोखाडा व जव्हार तालुक्यातील बहुतेक शेतकरी ही लहान शेतजमीन असलेली कुटुंबे असून ते ८ ते ९ महिने रोजंदारी करून हंगामी शेतीसाठी पैसा साठवतात. शेतात आवणी सुरू करताच पावसाने पाठ फिरवली आणि अनेक ठिकाणी अर्धवट लावणी झालेली असून उरलेले पीक हातातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतकरी चंद्रकांत झोले यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “आम्ही पायात चप्पलही न घेता पैसे वाचवतो आणि शेतीसाठी जमवतो. पण निसर्गानेच पाठ फिरवली, तर कोणाच्या दारात जाऊ?”
दुसरीकडे, शेतकरी कोंडाजी ठोमरे सांगतात की, “सुरुवातीला पावसाचे प्रमाण खूप जास्त होते, त्यामुळे रोपांची वाढ खुंटली. आता रोपे तयार झाली तरी लावणी करता येत नाही, कारण शेती कोरडीठाक आहे. नागली, भाता यांसारखी पिके संततधार पावशिवाय लावता येत नाहीत.”
या परिसरात सिंचनाची कोणतीही शाश्वत सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे पावसावरच संपूर्ण शेती अवलंबून आहे. तालुक्यात २–३ दिवस पाऊस न पडला, तरी पिकांना ताण येतो. सध्या मात्र पावसाने सातत्याने ओढ दिल्यामुळे, संपूर्ण तालुक्यातील लावणी कामे थांबली आहेत. त्यातच हवामान खात्याचा १७ ते २२ जुलैदरम्यान पावसाचा कमी अंदाज ही चिंता आणखी वाढवत आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर, मोखाड्यातील शेतकऱ्यांची स्थिती अतिशय बिकट झाली आहे. कष्टाने उभं केलेलं पीक हातातून निसटतंय, त्यामुळे “पड रे पाण्या, कर पाणी पाणी” असा आर्त आक्रोश शेतकऱ्यांच्या ओठांवर आहे. जर लवकरात लवकर समाधानकारक पाऊस झाला नाही, तर मोखाड्यातील हजारो शेतकऱ्यांना उपासमारीचा सामना करावा लागेल. सरकारने वेळीच लक्ष घालून मदत करण्याची गरज आता निर्माण झाली आहे.