माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (फोटो - ट्विटर )
कराड: राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सर्वच पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले आहेत. अनेक उमेदवारांनी अर्ज देखील भरले आहेत. दरम्यान राज्यात प्रचारसभा होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान कराडमध्ये बोलताना राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यावर भाष्य केले आहे. अजित पवारांनी तासगाव-कवठे महकाळ मतदारसंघातील सभेत बोलताना दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर काही आरोप केले होते. त्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महत्वाचे भाष्य केले आहे.
सिंचन घोटाळ्याबाबत अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर विचारले असता त्यांनी यावर भाष्य केले. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पांबाबत झालेल्या आरोपांवरून त्यावेळी मी या प्रकरणाची श्वेतपत्रिका काढली होती. त्याची पुढे अँटी करप्शनद्वारे चौकशी झाली. मात्र, त्यानंतर काही घडामोडी करून माझे सरकार पाडण्यात आले. यामुळे सिंचन प्रकल्पांच्या चौकशीची शिक्षा मला भोगावी लागली, अशी टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.