पुणे : खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत शोकाकुल वातावरण आणि शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘अमर रहे, अमर रहे…बापट साहेब अमर रहे,’ अशा घोषणा देत त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
गेल्या दोन वर्षापासून ते दुर्धर आजाराशी झुंजत होते. दोन दिवसांपूर्वी प्रकृती खालावल्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. काल रात्री त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. अखेर बुधवारी सकाळी बापट यांचे निधन झाले. त्यामुळे पुण्याच्या राजकीय क्षेत्रावर शोककळा पसरली. दुपारी दोन ते सांयकाळी पाच या वेळेत बापट यांचे पार्थिव शनिवार पेठेतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
पुणे पोलिस दलाच्या वतीने बापट यांच्या पार्थिवावर राष्ट्रध्वज ठेवण्यात आला. त्यानंतर शेकडो नागरिकांनी बापट यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. सायंकाळी पाच वाजता फुलांनी सजविलेल्या गाडीत त्यांचे पार्थिव ठेवून अंत्ययात्रा सुरु झाली. अंत्ययात्रेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील आदी मान्यवर सहभागी झाले होते. अंत्ययात्रेच्या मार्गावर विविध संघटना, गणेश मंडळांनी पार्थिवावर पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. तसेच मार्गावर विविध पक्षांच्या वतीने श्रद्धांजली वाहणारे फलक लावण्यात आले होते. वैकुंठ स्मशानभूमीत पुणे पोलिस दलाच्या वतीने खासदार बापट यांना मानवंदना देण्यात आली.
यावेळी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदींनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. अंत्यसंस्कारावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस, खासदार प्रकाश जावडेकर, श्रीरंग बारणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.