Solapur News : नजीक पिंपरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक; माजी आमदार पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन
मोहोळ : मोहोळ तालुक्यातील नजीक पिंपरी येथे ‘विश्वरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती अत्यंत उत्साहात आणि शांततेत साजरी करण्यात आली. भीम क्रांती तरुण मंडळाच्या वतीने आयोजित या सोहळ्यात भव्य मिरवणूक, भीमगीतांचा कार्यक्रम आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी मोहोळ पंचायत समितीचे सभापती अस्लम चौधरी, उपसभापती अलका पाटील, जिल्हा परिषद सदस्य लखन शिंदे, बालाजी नरुटे, सचिन जाधव, नागेश भोसले आणि विमल खताळ यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
गुरुवारी (दि.२३) सायंकाळी ६ वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली. फटाक्यांची भव्य आतिषबाजी आणि ‘जय भीम’ च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. लेझीम पथक आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर अबालवृद्धांसह महिलांनी मोठा उत्साह दर्शवला. भीम क्रांती तरुण मंडळाच्या वतीने आयोजित भीमगीतांच्या कार्यक्रमाने सामाजिक प्रबोधन करण्यात आले. मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत सुमारे १००० अनुयायांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा मंडळाच्या वतीने फेटा बांधून यथोचित सत्कार करण्यात आला.
भीम क्रांती तरुण मंडळाच्या वतीने १९८४ पासून सलग ४२ वर्षे ही जयंती साजरी केली जात आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेच्या वातावरणात ही मिरवणूक पार पडली. या सोहळ्याचे नियोजन मंडळाचे मार्गदर्शक व माजी उपसभापती अशोक सरवदे आणि अध्यक्ष ऋतुराज गजगाटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लखन काळे, समाधान शिवशरण, दादा काळे, बाजीराव सरवदे, सुरज बनसोडे, आनंद सरवदे, बाळू काळे, गौतम काळे, प्रवीण सरवदे, प्रमोद सरवदे आणि मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.






