सोलापूर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त होटगीरोङ वरील आसरा चौकातून तिरंगा जगजागृतीसाठी भर पावसात ‘हर घर तिरंगा व स्वराज्य महोत्सव’ निमित्त भव्य रॅली जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा व दिनांक १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत आपल्या घरावर तिरंगा झेंडा फडकवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हर घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत आयोजीत जनजागृतीपर सायकल रॅलीच्या होटगी गाव येथील समारोप कार्यक्रमात जिल्हाधिकारी शंभरकर बोलत होते. यावेळी आमदार सुभाष देशमुख, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, उपजिल्हाधिकारी चारुशिला देशमुख, सुमित शिंदे हेमंत निकम, अनिल कारंडे, तहसीलदार अमोल कुंभार दत्तात्रय मोहोळे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी शंभरकर पुढे म्हणाले की, आजादी का अमृत महोत्सवांतर्गत जिल्हा प्रशासनामार्फत हर घर तिरंगा व स्वराज्य महोत्सव घेण्यात येत आहेत. या अंतर्गत जिल्ह्यात सर्वत्र विविध कार्यक्रम सुरू असून, नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी दिनांक 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकावून या मोहिमेत सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत जिल्हा प्रशासनामार्फत विविध कार्यक्रम सुरू असून यामध्ये नागरिकांनीही सक्रिय सहभाग घ्यावा. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत आहेत. तसेच आपले राष्ट्र वैभवशाली करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा व आपल्या देशाप्रती आदराची भावना म्हणून प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा झेंडा फडकावावा, असे आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केले.
[read_also content=”राज्यातील ED सरकार महाराष्ट्रासाठी आहे का गुजरातसाठी ? : नाना पटोले https://www.navarashtra.com/maharashtra/s-the-ed-government-in-the-state-for-maharashtra-or-for-gujarat-nana-patole-nrdm-313977.html”]
प्रारंभी आसरा चौक येथे जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस अधीक्षक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी सकाळी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले होते. पाऊस सुरू असतानाही हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत सायकल रॅलीस सुरुवात झाली. भर पावसात रॅलीमध्ये सहभागी अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये जनजागृतीपर सायकल रॅलीसाठी मोठा उत्साह दिसून येत होता. प्रमुख अधिकाऱ्यांच्या आसरा चौक येथून रॅलीस प्रारंभ झाला ही रॅली विमानतळमार्गे सिद्धेश्वर कारखाना समोरून होटगी गाव पर्यंत गेली. यावेळी होटगीचे सरपंच श्रीमती लक्ष्मीबाई गायकवाड, उपसरपंच असीम शेख व ग्रामस्थांनी या जनजागृतीपर सायकल रॅलीमध्ये सहभागी अधिकारी कर्मचाऱ्यांचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले. होटगी ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी शंभरकर व आमदार देशमुख व अन्य मान्यवरांच्या हस्ते ग्रामस्थांना भारतीय राष्ट्रध्वजाचे वितरण करण्यात आले.