हृदयविकाराच्या झटक्याचा प्रतिबंध आणि त्याचे व्यवस्थापन कसे करावे? जाणून घ्या हिवाळ्यात नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व

  हिवाळा सुट्ट्यांचा आनंद घेऊन येतो पण त्याचबरोबर आरोग्यविषयक नवीन तक्रारी, विशेषतः हृदयाशी संबंधित समस्या देखील घेऊन येतो. हृदय विकाराच्या झटक्याच्या धोक्याचा प्रतिबंध करण्यासाठी आणि त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी, विशेषतः हिवाळ्याच्या महिन्यांमध्ये नियमित आरोग्य तपासणी करून घेणे आवश्यक आहे, असे मत तन्मय येरमळ (जैन), (सल्लागार – कार्डिओलॉजी, मणिपाल हॉस्पिटल खराडी, पुणे) यांनी व्यक्त केले. जाणून घेऊयात त्यांनी याबाबत दिलेली महत्वपूर्ण माहिती…

  हिवाळ्यात हृदयविकाराच्या झटक्याचा धोका समजून घेणे
  हिवाळ्याच्या मोसमात बऱ्याचदा हृदय विकाराच्या प्रकरणांत वाढ झाल्याची दिसून येते, ज्याची विविध कारणे असू शकतात- उदा. थंड हवा, वाढलेला रक्तदाब आणि शारीरिक हालचाली कमी होणे. थंड तापमानात रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे रक्ताचा दाब वाढतो आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका देखील वाढतो. नियमित आरोग्य तपासणी केल्यास हायपरटेंशन आणि इतर धोक्यांविषयी लवकर समजते आणि लवकर उपचार करता येतात.

  रक्तदाबावर देखरेख:
  अजूनही हायपरटेंशन हे हृदय विकाराच्या झटक्यासाठी जबाबदार असलेले महत्त्वाचे परिबळ आहे. नियमित तपासणीमुळे रक्तदाबाच्या पातळीवर देखरेख ठेवता येते आणि त्यामुळे आपल्या नेहमीच्या पातळीत बदल आढळल्यास लवकरात लवकर उपचार करता येतात. वेळेवर औषधोपचार किंवा जीवनशैलीतील बदल यामुळे उच्च रक्तदाबाशी निगडीत हृदय विकाराच्या झटक्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकतो.

  कॉलेस्ट्रॉल व्यवस्थापन:
  हिवाळ्यात आपल्या आहाराच्या सवयीत बदल होतात. जिभेला आवडणारे अन्न खाण्याकडे कल वाढतो ज्यामध्ये आरोग्यास हानिकारक चरबी असते. कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यास एथेरोस्क्लेरॉसिस वाढते, जे हृदय विकाराच्या झटक्यासाठीचे मुख्य परिबळ आहे. आरोग्य तपासणी केल्यास लिपीड प्रोफाइलचे मूल्यमापन होते आणि त्यानुरूप आवश्यक तो आहार आणि औषधोपचार नक्की करून स्वास्थ्यप्रद कॉलेस्ट्रॉलची पातळी कायम राखण्यात मदत होते.

  मधुमेह तपासणी:
  मधुमेह हे हृदयविकाराच्या झटक्यासाठी जबाददार असेलले एक ज्ञात परिबळ आहे आणि हिवाळ्यात शारीरिक हालचाली आणि आहाराच्या सवयीतील बदलांमुळे हा धोका वाढू शकतो. नियमित आरोग्य तपासणीत मधुमेह तपासणी देखील समाविष्ट असते, ज्यामुळे लवकर छडा लागून त्याचे व्यवस्थापन करणे शक्य होते. मधुमेहाशी निगडीत रक्तवाहिन्यांशी संबंधित जटिलता कमी करण्यासाठी योग्य ग्लायसेमिक नियंत्रण महत्त्वाचे आहे.

  जीवनशैलीतील बदल:
  हिवाळ्यामुळे शरीराच्या बाह्य हालचाली बऱ्याचदा खूप कमी होतात आणि त्यामुळे जीवनशैलीतील सक्रियता कमी होते. नियमित आरोग्य तपासणीमुळे डॉक्टरांना आपल्या रुग्णांना थंडीच्या दिवसांत देखील सक्रिय जीवनशैली कायम ठेवण्याचे महत्त्व समजावून देण्याची संधी मिळते. नियमित व्यायाम आणि संतुलित आहार यांसारख्या जीवनशैलीतील माफक बदलांमुळे हृदय विकाराच्या झटक्याचा धोका लक्षणीयरित्या कमी होऊ शकतो.

  औषधोपचाराचे काटेकोरपालन:
  ज्या लोकांना आधीपासूनच हृदयवाहिकांचा रोग असेल, त्यांच्यासाठी नेमून दिलेली औषधे नियमित घेणे अत्यावश्यक आहे. नियमित आरोग्य तपासणीमुळे तीच औषधे चालू ठेवावी का, की गरजेनुसार औषध किंवा डोस यात बदल आवश्यक आहे हे समजते तसेच काही दुष्परिणाम असल्यास त्यावर उपचार करणे शक्य होते. हृदय विकाराचा झटका पुन्हा येऊ नये यासाठी नियमित आणि वेळेवर औषधे घेणे फार महत्त्वाचे आहे.
  शिवाय, हिवाळ्यात हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीचे विशिष्ट आजार बळावतात, ज्यामध्ये प्रामुख्याने हृदय विकाराच्या हल्ल्याची समस्या उद्भवते. हृदय विकाराच्या हल्ल्याच्या प्रतिबंधासाठी तसेच त्याचे व्यवस्थापन करण्यास नियमित आरोग्य तपासणी अत्यावश्यक आहे कारण त्यामुळे धोक्याचे घटक निदर्शनास येतात, महत्त्वपूर्ण निर्देशकांचे निरीक्षण होते आणि निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन मिळते. आरोग्यसेवा तज्ज्ञ या नात्याने आम्ही आमच्या रुग्णांना नियमित आरोग्य मूल्यमापनाद्वारे, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्याविषयी, विशेषतः हिवाळ्याच्या मोसमात सक्रिय वृत्ती विकसित करून आपल्या आरोग्याला प्राधान्य देण्यास प्रवृत्त करतो.