सोलापूर : भाजपने आम्हाला एकही जागा दिली नसल्याने त्यांच्यासोबत का जाऊ, असा प्रश्न विचारत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी शरद पवार यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. माढा मतदारसंघातून मी अडीच लाखांच्या मतांनी विजयी होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
माढा मतदासंघातून महायुतीने भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली असून, त्यांच्या नावाला महायुतीतील घटकपक्षांना विरोध आहे. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शरद पवार यांच्या वाट्याला आला आहे. त्यामुळे पवार यांनी महादेव जानकर यांना पाठिंबा दिला आहे. यावर जानकर यांनी पवारांचे आभार मानले आहेत.
जानकर पुढे म्हणाले, शरद पवार यांनी राष्ट्रीय समाज पक्षाला माढ्याची जागा दिली आहे. या मतदारसंघातून मी अडीच लाख मतांनी निवडून येणार आहे. राष्ट्रीय समाज पक्षाच्या तीने मी महाविकास आघाडीकडे 3 जागा मागितल्या होत्या.
भाजपने मित्रपक्ष संपवायचे काम केले
भाजपमध्ये मोठे खेळाडू आल्याने त्यांना छोट्या खेळाडूंची गरज राहिली नाही. त्यामुळे भाजपने आम्हाला जागा दिली नाही. भाजपने मित्रपक्ष संपवायचे काम केले आहे. अशा परिस्थितीत आम्ही भाजपसोबत का जाऊ, असा सवाल जानकर यांनी केला. गेल्या दोन महिन्यांपासून शरद पवार आणि माझी याबाबत चर्चा सुरु आहे. तुम्ही आमच्याबरोबर आलात तर चांगलं होईल, असे शरद पवार म्हणाल्याचे जानकर यांनी सांगितले.
निंबाळकर-मोहिते पाटील सहकार्य करणार
सध्या भाजपसोबत असलेल्या रामराजे नाईक निंबाळकर आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. हे दोन्ही नेते माझे मार्गदर्शक आहेत. हे नेते मला सहकार्य करतील. यामध्ये तिळमात्र शंका नसल्याचे महादेव जानकर म्हणाले.