अजित पवारांचा विमान दुर्घटनेत मृत्यू (फोटो- सोशल मीडिया)
अजित पवार यांचे अपघाती निधन
यंत्रमाग उद्योगाला पाठबळ देणारा नेता हरपला
वस्त्रो्योगाकडे डोळस नजरेने पाहणारा नेता म्हणून ओळख
इचलकरंजी: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्यामुळे (ichalkaranji) वस्त्रोद्योग क्षेत्राची व खासकरून यंत्रमाग उद्योगाला पाठबळ देणारा नेता हरपला, अशी भावना वस्त्रनगरीतून व्यक्त केली जात आहे. वस्त्रो्योगाकडे डोळस नजरेने पाहणारा व नेहमी पाठिशी राहणारा नेता हरपल्याची भावना संपूर्ण इचलकरंजीकरांची आहे. त्यांना इचलकरंजीतील तमाम यंत्रमागधारकांच्याकडून व दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
नेहमी महाराष्ट्रामध्ये वस्त्रोद्योग व यंत्रमाग उद्योगाला अर्थमंत्री असणाऱ्या अजित पवार यांनी पाठबळ दिलेले आहे. वेगवेगळ्या योजना करताना नेहमीच ते सकारात्कम असत. इचलकरंजीतील वस्त्रोद्योगाकडे त्यांचे खास लक्ष असायचे. वस्त्रोद्योगातील कोणताही प्रश्न घेऊन गेल्यास त्वरीत त्यामध्ये लक्ष घालून तो प्रश्न सोडविण्याकडे त्यांचा कल असायचा किंवा इतर विभागाकडे असेल तर ते लगेचच फोन करून संबंधीत मंत्र्यांना सुचना करीत.
यंत्रमाग उद्योगाचा १ रुपये व ७५ पैशांचा अतिरिक्त वीज सवलतीचा निर्णय प्रलंबित होता. तो प्रश्न त्यांच्यासमोर मांडल्यानंतर त्यांनी त्वरीत त्याची अंमलबजावणी करण्याच्या सुचना संबंधित सचिवांना दिल्या व दुसऱ्याच दिवशी होणाऱ्या कॅबिनेट मिटींगमध्ये तो विषय संमत करून घेण्ाविषयी सांगितले. यानंतरही संबंधीत अधिकाऱ्यांनी ती योजना फक्त ३१ मार्च २०२४ पर्यंत लागू असेल असा मसुदा तयार केला होता. त्यासंदर्भात पुन्हा दादांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी त्या अधिकाऱ्यांना झापले व कायमस्वरूपी ही योजना चालू राहील असा प्रस्ताव करण्यासंदर्भात आदेश दिले होते.
नेहमीच इचलकरंजीला झुकते माप
इचलकरंजीवर नेहमी प्रेम करणारे विविध विषयात झोपडपट्टीचा विषय असो, पाण्याचा विषय असो, आ.जी.एम.चा विषय असो, झेड.एल.डी. च्या विषयासंदर्भात त्यांनी नेहमीच इचलकरंजीला झुकते माप दिले आहे. त्याचबरोबरीने काही महिन्यांपूर्वी झालेल्या भाई नेरूरकर चषक खो-खो स्पर्धेसाठी शासनाकडून भरीव आर्थीक तरतूद करून इचलकरंजीला या स्पर्धा व्हाव्यात यासाठी मदत केली होती. तसेच बक्षिस वितरण समारंभाला स्वत: हजर राहून फाईनलचा सामना ग्राऊंडवर बसुन त्यांनी पाहिला. या आठवणी ताज्या असताना अजितदादांचे अचानक निघून जाणे हृदयविदारक आहे.
अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी बारामती येथे विमान कोसळून झालेल्या अपघातामध्ये निधन झाले. अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. छोट्या कार्यकर्त्यालाही प्रोत्साहन देणारे, कडक स्वभावामागे अपार प्रेम जपणारे आणि शब्दांइतकेच कृतीत ठाम असलेले नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दांत माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.






