मंगळवेढा शिवारात अल्प पावसावर उगवून आलेले ज्वारीचे पिक छायाचित्रात दिसत आहे.(छाया-शिवाजी पुजारी,मंगळवेढा.)
मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यात यंदा निसर्गाने पावसाळी हंगामात हुलकावणी दिल्याने अत्यल्प पाऊस पडला असून केवळ ज्वारीच्या 26 टक्के पेरण्या झाल्या असून गोरगरीबांची भाकरी महागण्याची शक्यता शेतकरी वर्गातून वर्तविली जात आहे.
पावसाळी हंगामात पावसाचे महत्वाचे नक्षत्र म्हणून मृग नक्षत्राकडे पाहिले जाते. या नक्षत्रात पाऊस न पडल्याने खरीपाच्या पेरण्या होवू शकल्या नाहीत. जुलै महिन्यात पडलेल्या अत्यल्प पावसावर खरीपाच्या पेरण्या,महागडे बियाणे खरेदी करून शेतकर्यांनी केल्या. मात्र पुढील नक्षत्रेही पावसाअभावी कोरडी गेल्याने पिकांची वाढ होवू शकली नाही तसेच उष्णतेचा वाढता पारा या मुळे पिके करपून गेली.या सर्व नैसर्गिक संकटाचा सामना करीत शेतकर्यांची अपेक्षा रब्बी हंगामावर होती.मात्र या हंगामातही पावसाची नक्षत्रे कोरडी गेल्याने बळीराजाचा जीव टांगणीला लागला होता.मंगळवेढयाच्या काळया शिवारात उत्तरा नक्षत्रात प्रतिवर्षी ज्वारीच्या पेरण्या सुरु होतात.यंदा उत्तरा नक्षत्रात पाऊस न झाल्यामुळे काही शेतकर्यांनी निसर्गावर हवाला ठेवून महागडी बियाणे,खते तसेच बैल बारदाना भाडयाने लावून कोरडया जमिनीत पेरणी केली. उत्तरा नक्षत्राच्या शेवटच्या चरणात हलका पाऊस पडल्याने पेरलेले बियाणे सुस्थितीत उगवून आल्याचे शिवारात दिसून येत आहे.भविष्यात त्याच्या वाढीसाठी पावसाची नितांत गरज आहे.हस्त नक्षत्र हे पावसाळयातील शेवटचे व भरवशाचे नक्षत्र म्हणून आत्तापर्यंत ओळखले जात आहे.मात्र या नक्षत्रातही म्हणावा तसा पाऊस न पडल्यामुळे पेरलेल्या ज्वारीचे काय होणार या चिंतेने शेतकरी वर्ग ग्रासून गेला आहे.यंदा खरीप पिकावरही अस्मानी संकट कोसळले असताना पुन्हा रब्बी हंगामही संकटात सापडल्यामुळे शेती व्यवसाय हा जुगार ठरत असल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहेत.या अस्मानी संकटामुळे मुला मुलींचे शिक्षण,लग्ने व प्रपंचाचा गाडा कसा हाकायचा या व्दिधा अवस्थेत तो सध्या सापडला आहे. तालुक्यात रब्बी ज्वारीचे क्षेत्र 35,457 हेक्टर इतके असून प्रत्यक्ष पेरणी 9,348 क्षेत्रावर झाली असून रास होवून धान्य घरी नेईपर्यंत हे बिनभरवशाचे असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.
यंदाच्या पावसाळयात ओढे,नाले भरून वाहिलेच नाहीत
यंदाच्या पावसाळी हंगामात तालुक्यात ओढे,नाले भरून वाहिले नसल्यामुळे भूगर्भाच्या पाणी पातळीत बिलकुल वाढ झाली नाही.परिणामी भविष्यात जानेवारीनंतर पाणी टंचाईला मोठा सामना करावा लागणार आहे.तालुक्याच्या दक्षिण भागात सध्या पाण्याची भिषणता जाणवत आहे.नदीकाठ भागातही सोलापूरला पाणी सोडल्यामुळे काही अंशी नदीकाठावरील गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. धरणात सध्या 60 टक्के पाणी साठा असला तरी पिण्याचे पाणी महत्वाचे असल्यामुळे शेतीला पाण्याची पाळी दिली जाणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे.तसेच उजनी धरणातील पाणी साठा बाष्पीभवनामुळे काही अंशी कमी होणार आहे.या सर्वांची बेरीज केली असता मार्च,एप्रिल,मे,जून हे महिने कसे जाणार या चिंतेने नागरिकांना ग्रासले आहे. धरणात पाणी साठा कमी असल्यामुळे याचा परिणाम नदीकाठावरील ऊस शेतीवर होणार असल्याने साखर कारखानदारी पुढील वर्षी कशी चालणार असाही प्रश्न आहे.