कोल्हापूरमध्ये सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला प्रकरणी इंडिया आघाडीने आंदोलन केले (फोटो - टीम नवराष्ट्र)
Follow Us:
Follow Us:
Bhushan Gavai attack : कोल्हापूर : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर वकील राकेश किशोर यांनी हल्ला केला. या प्रकरणावरुन संपूर्ण देशामध्ये रोष व्यक्त केला जात असून या हल्ल्याचे पडसाद कोल्हापूर, पुणे शहरांमध्ये देखील उमटत आहेत. या हल्ल्याविरोधात कोल्हापुरात इंडिया आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. कोल्हापूरातील शिवाजी चौकात निदर्शने करण्यात आली. ‘मोदी सरकार चले जाओ’, ‘हल्ला करणाऱ्या मनुवादी विचारसरणीचा धिक्कार असो’ अशा घोषणांनी इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.
भारतीय न्यायव्यवस्थेचे सर्वोच्च स्थान असलेल्या सर्वोच्च न्यायालयात एका सुनावणीदरम्यान वकील राकेश किशोर यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट भिरकावल्याचा प्रकार सोमवारी घडला. या घटनेच्या विरोधात देशभरात प्रचंड संतापाची लाट पसरली आहे. राज्यातील विविध पक्षांनी या घटनेचा धिक्कार केला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांनी राज्यात ठिकठिकाणी निषेध दर्शवून केंद्रातील भाजपा सरकारवर टीकेची जोड उठवली आहे.
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ इंडिया आघाडीच्या वतीने शिवाजी चौकात निदर्शनं करण्यात आली. यावेळी केंद्र सरकार आणि मनुवादी विचार जोपासणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. तर सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्रींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला जाण्यास नकार दिल्याच्या रागातूनच वकील राकेश किशोर यांनी हा प्रकार केल्याचा दावा कम्युनिस्ट पक्षाचे माजी राज्यसचिव उदय नारकर यांनी केला.
कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यामागं संपूर्ण देश खंबीरपणे उभा आहे. छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांचा विचार दडपण्याचा प्रकार सहन केला जाणार नाही,” असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी दिला. यावेळी कम्युनिस्ट पक्षाचे माजी सचिव उदय नारकर, माजी महापौर आर. के. पवार, भारती पवार, डी. जी. भास्कर, सुभाष देसाई, कॉम्रेड चंद्रकांत यादव, रघुनाथ कांबळे, विशाल देवकुळे, राजू यादव यांच्यासह इंडिया आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट
कोल्हापुरात ४२ वर्षांच्या लढ्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन करण्यात सरन्यायाधीश भूषण गवई यांची महत्त्वाची भूमिका होती. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न होत असेल तर ते निषेधार्थ आहे. त्यामुळं कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाचे कामकाज बंद ठेवून या घटनेचा आम्ही निषेध करतो, अशी भूमिका कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशननं मांडली. यावेळी अध्यक्ष व्ही. आर. पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Web Title: India aghadi protests over attack on chief justice bhushan gavai kolhapur news update