गेल्या काही दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या पावसामुळे दररोज झाडे किंवा फांद्या कोसळण्याच्या घटना घडत आहेत. अनेकदा वाहनांचे नुकसान होते, वाहतूक विस्कळीत होते, तर काही वेळा जीवितहानीच्याही घटना घडतात. या पार्श्वभूमीवर ‘नवराष्ट्र’ने शहरातील वृक्षांची स्थिती आणि झाडे कोसळण्यामागील कारणांचा वनस्पती तज्ज्ञांच्या मदतीने आढावा घेतला.
तज्ज्ञांच्या मते, झाडाचे खरे बळ त्याच्या मुळांमध्ये असते. मात्र शहरात अनेक ठिकाणी झाडांच्या बुंध्याभोवती सिमेंटचे चौथरे, पेव्हर ब्लॉक किंवा खोडाला चिकटून पादचारी मार्ग तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे मुळांना हवा, पाणी आणि आवश्यक पोषकद्रव्ये मिळत नाहीत. परिणामी झाडांची वाढ खुंटते आणि ती आतून कमकुवत होत जातात.
पावसाच्या सरींमध्ये रुजतंय हरित स्वप्न; ‘फॉरेस्ट’चा १० लाख सीडबॉल्सचा संकल्प
रस्ते रुंदीकरण, जलवाहिनी, मलवाहिनी किंवा इतर भूमिगत सुविधांच्या कामांसाठी खोदकाम करताना झाडांची मुख्य मुळे कापली जातात. त्यामुळे झाडांची जमिनीवरील पकड कमी होते. अतिवृष्टीमुळे माती भुसभुशीत होते आणि अशा कमकुवत झालेल्या झाडांना जोरदार वाऱ्याचा ताण सहन करणे अवघड जाते. काही झाडांमध्ये कीड, बुरशीजन्य संसर्ग किंवा मुळे कुजण्याची समस्या निर्माण होते. बाहेरून हिरवीगार आणि निरोगी दिसणारी झाडे आतून मात्र पोकळ झालेली असू शकतात. त्यामुळे ती कोणत्याही क्षणी कोसळू शकतात.
अयोग्य छाटणी हेही झाडे पडण्यामागील एक महत्त्वाचे कारण आहे. अनेकदा एका बाजूच्या फांद्या अधिक छाटल्या जातात. त्यामुळे झाडाचा भार असंतुलित होतो आणि जोरदार वाऱ्याच्या वेळी झाड कोसळण्याचा धोका वाढतो. त्याचप्रमाणे वेगाने वाढणाऱ्या काही वृक्षप्रजातींची लाकडी रचना तुलनेने कमकुवत असल्याने त्या वादळाचा ताण सहन करू शकत नाहीत. हवामान बदलामुळे कमी कालावधीत होणारी अतिवृष्टी, वेगवान वारे आणि चक्री हवामानाच्या घटनांमुळे झाडांवरील ताण आणखी वाढत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
‘शहरातील सर्व जुन्या आणि मोठ्या झाडांचे ‘ट्री सेफ्टी ऑडिट’ करणे आता अत्यंत गरजेचे आहे. झाडांची वैज्ञानिक पद्धतीने आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली छाटणी झाली पाहिजे. अनियंत्रित छाटणी टाळली पाहिजे. तसेच झाडांच्या बुंध्याभोवतीचे सिमेंट किंवा पेव्हर ब्लॉक काढून मोकळी माती उपलब्ध करून दिल्यास मुळांना हवा आणि पाणी मिळेल. रस्ते, जलवाहिनी किंवा मलवाहिनीची कामे करताना झाडांची मुख्य मुळे कापली जाणार नाहीत, याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.’
– डॉ. श्रीनाथ कवडे, वनस्पतीतज्ज्ञ
‘झाडांच्या निरोगी वाढीसाठी त्यांच्या खोडाभोवती मोकळी माती असणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे पावसाचे पाणी थेट मुळांपर्यंत पोहोचते, मुळांना ऑक्सिजन मिळतो आणि त्यांची नैसर्गिक वाढ होते. वृक्षलागवड करतानाही स्थानिक प्रजातींना प्राधान्य द्यावे. प्रजातीनुसार साधारण सहा ते दहा मीटर किंवा त्यापेक्षा अधिक अंतर ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे मुळांना आणि फांद्यांना विस्तारासाठी पुरेशी जागा मिळते. भविष्यात झाडे कोसळण्याचा धोका कमी करण्यासाठी हा साधा पण महत्त्वाचा उपाय ठरू शकतो.’
– सचिन पुणेकर, वनस्पती अभ्यासक
आई शप्पथ! 23% पावसाचे थेंब जमिनीवर पोहोचण्याआधीच…; ‘ IITM ‘च्या संशोधनातून निष्कर्ष
झाडे पडू नयेत म्हणून…
– झाडांची नियमित आरोग्य तपासणी करून कीड, बुरशी किंवा मुळे कुजल्याची लक्षणे तपासावीत.
– झाडांची वैज्ञानिक पद्धतीने आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली छाटणी करावी; एकाच बाजूने अति छाटणी टाळावी.
– रस्ते, जलवाहिनी किंवा मलवाहिनीच्या कामांदरम्यान झाडांची मुख्य मुळे कापली जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी.
– झाडांच्या बुंध्याभोवतीचे सिमेंट, पेव्हर ब्लॉक किंवा काँक्रीट काढून मोकळी माती उपलब्ध करून द्यावी.
– वृक्षलागवड करताना योग्य वृक्षप्रजातीची निवड करून दोन झाडांमध्ये प्रजातीनुसार साधारण ६ ते १० मीटर अंतर ठेवावे.
– झाडांना खिळे ठोकणे, बुंध्याभोवती काँक्रीटीकरण करणे किंवा बांधकाम साहित्य साठवणे टाळावे.
– धोकादायक झाडे किंवा फांद्या आढळल्यास तातडीने महापालिकेला माहिती द्यावी.






