Baramati By-Election: जय पवार होणार बारामतीच्या भविष्याचा चेहरा; उमेदवारीच्या प्रश्नावर काय म्हणाले अजितदादांचे धाकटे चिरंजीव?
दरम्यान, आज (गुरुवार, ता. २३) मतदानासाठी सुनेत्रा पवार यांच्यासोबत आलेल्या जय पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी २०२९ च्या संभाव्य उमेदवारीबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना जय पवार म्हणाले, “२०२९ मध्ये मी उमेदवार व्हावे, अशी लोकांची आणि कार्यकर्त्यांची मागणी आहे. मात्र, मला सध्या कार्यकर्ता म्हणूनच काम करायचे आहे.”
जय पवार यांच्या या प्रतिक्रियेमुळे त्यांनी सध्या तरी उमेदवारीबाबत थेट दावा टाळल्याचे स्पष्ट झाले असले, तरी भविष्यातील राजकीय समीकरणांबाबत चर्चांना आणखी वेग मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Baramati Byelection 2026: शरद पवार बारामतीत का येऊ शकले नाहीत?
पत्रकारांच्या प्रश्नांवर उत्तर देताना जय पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “२०२९ मध्ये मी उमेदवार व्हावे, अशी लोकांची आणि कार्यकर्त्यांची मागणी आहे. पण मला पक्षाचा एक छोटा कार्यकर्ता म्हणूनच काम सुरू ठेवायचे आहे आणि सर्वांना मदत करायची आहे, अशी माझी इच्छा आहे. ” उमेदवारीपेक्षा कार्यकर्ता म्हणून काम करण्यालाच आपले प्राधान्य असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
दरम्यान, बारामतीतील मतदानाच्या पार्श्वभूमीवर जय पवार यांनी मतदारांना भावनिक आवाहनही केले. “यावेळेस जसं अनेक वर्ष ‘दादां’वर प्रेम केलं, तसंच दादांवर आणि वहिनींवरही प्रेम करा. वहिनी भरघोस मतांनी निवडून येतील, ही आमची आशा आहे,” असे ते म्हणाले.
बारामतीकरांनी ही निवडणूक मनावर घेतली असून मतदानाची टक्केवारी वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. “८५ ते ९० टक्क्यांपर्यंत मतदान होईल, अशी अपेक्षा आहे. काल मी सर्व पोलिंग एजंटशी संवाद साधला असून त्यांनीही चांगल्या प्रतिसादाची माहिती दिली,” असे जय पवार यांनी सांगितले.
विजयाचा फरक किती असेल, याबाबत विचारले असता त्यांनी संयमाने उत्तर दिले. “रेकॉर्डब्रेक मतांनी विजय होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र किती मतांनी निवडून येतील, याबाबत आत्ता काही सांगता येणार नाही. आपण ४ तारखेला निकाल पाहू,” असे ते म्हणाले.






