Baramati Byelection 2026: शरद पवार बारामतीत का येऊ शकले नाहीत?
Baramati By-election 2026 Sharad Pawar: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. संपूर्ण राज्याचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या जागेवर निवडणूक लढवत आहेत. आज मतदानाला जाण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी विद्या प्रतिष्ठान येथे अजितदादांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले त्यानंतर त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. तसेच, त्यांनी सर्व बारामतीकरांनाही मतदान करण्याचे आवाहन केले.
सुनेत्रा पवार यांच्यानंतर स खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला. (Baramati Byelection 2026) दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवार यांनी या निवडणुकीसाठी सुनेत्रा पवार याना पाठिंबा जाहीर केला आहे. पण यावेळी बारामती पोटनिवडणुकीसाठी ते आपला मतदानाचा हक्क बजावू शकणार नाहीत, अशी माहिती समोर आली आहे.
By Election : बारामतीसह राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; 4 मे ला निकाल होणार जाहीर
यासंदर्भात त्यांनी स्वत: सोशल मीडियावर माहिती दिली आहे. याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या कि, शरद पवार यांना मतदान करायचं होतं, पण एक्स्प्रेस वे बंद असल्याने आणि हेलिकॉप्टरने येणंही शक्य नाही. शरद पवारांची प्रकृती आता बरी आहे. त्यांना मतदानाला यायचं होतं. पण एक्सप्रेस-वे बंद असल्याने आणि हेलिकॉप्टरने येणे शक्य नसल्यामुळे त्यांना येऊ शकले नाहीत. आज डिस्चार्ज मिळेल.” दरम्यान, मतदानानंतर सुप्रिया सुळे अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार यांची भेट घेणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.
दरम्यान, शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर पोस्ट करून २३ एप्रिलला होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी मतदान करू शकणार नसल्याचे सांगितले होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मुंबईबाहेर प्रवास न करण्याचा सल्ला दिला होता.
मी १९६७ मध्ये लढविलेल्या पहिल्या निवडणुकीपासून बारामती मतदारसंघातील माझ्या मतदानाचा हक्क अखंडपणे बजावला. आता २०२६ मध्ये बारामती विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्राचे एक लाडके व लोकप्रिय नेते स्व. अजित पवार यांच्या दुर्दैवी, अपघाती निधनाच्या शोकात्म पार्श्वभूमीवर ही पोटनिवडणूक होत आहे.
या पोटनिवडणुकीसाठी बारामती येथे येऊन आतापर्यंतच्या प्रघातानुसार मतदान करण्याचे मी ठरवले होते. दुर्दैवाने माझी प्रकृती बिघडल्याने मला मुंबईत रुग्णालयात दाखल व्हावे लागले. डॉक्टरांनी मला उपचार आणि सक्तीची विश्रांती या कारणास्तव मुंबईबाहेर जाण्यास मनाई केली आहे. त्यामुळे अत्यंत नाईलाजास्तव मतदानाचा हक्क बजावण्यापासून मला वंचित रहावे लागत आहे, हे मी अत्यंत व्यथित आणि खेदपूर्ण अंत:करणाने सांगू इच्छितो. माझ्यावर अथक प्रेम व विश्वास असलेले बारामतीचे नागरिक, मतदार व कार्यकर्ते मला समजुन घेतील याची मी खात्री बाळगतो.
आमच्या पक्षाने (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार) या पोटनिवडणुकीत श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना पाठिंबा जाहिर केला आहे. स्व. अजित पवार यांना ही एकप्रकारे आमच्या पक्षातर्फे श्रद्धांजलीच आहे. माझे बारामतीमधील सर्व मतदारांना आवाहन आहे की, त्यांनी श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करून स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करावी.
बारामतीमधील मतदार यांनी माझ्यावर प्रदीर्घ विश्वास ठेवलेला आहे. ते या आवाहनास प्रतिसाद देतील, असा मला विश्वास आहे.
मतदानासाठी प्रत्यक्ष न येता निवडणुक आयोगाच्या विविध पर्यायांचा देखील मी तपास केला व विचारणा केली. परंतु ते पर्याय उपलब्ध नसल्याचे राज्याच्या निवडणुक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. अखेर अतिशय व्यथित व जड अंत:करणाने मला मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय करावा लागला. या पोटनिवडणुकीत श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करावे, असे मी बारामतीकरांना पुन्हा एकदा आवाहन करतो.
धन्यवाद !






