बारामतीत पवार कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला! प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शरद पवारांचा रुग्णालयातून 'मास्टरस्ट्रोक'
Baramati By-Poll: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या प्रचाराची सांगता सभा आज बारामतीत पार पडली. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सुनेत्रा पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंबियांनी बारामती पिंजून काढली होती. त्यानंतर आज बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठीची सांगता सभा पार पडली. या सभेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि सुप्रिया सुळे यांनी उपस्थिती लावली.
पण त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार शरद पवार हे मात्र या सभेला हजर राहू शकले नाही. शरद पवार यांची प्रकृती बिघडल्यामुळे आज दुपारच्या सुमारास त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. एकीकडे ही प्रचाराची सांगता सभा पार पडत असताना दुसरीकडे शरद पवार यांनी रुग्णालायतून एक ट्विट करत बारामतीकरांना सुनेत्रा पवार यांना मतदान करण्याचे आवाहन केलं आहे.
“मी १९६७ मध्ये लढविलेल्या पहिल्या निवडणुकीपासून बारामती मतदारसंघातील माझ्या मतदानाचा हक्क अखंडपणे बजावला. आता २०२६ मध्ये बारामती विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्राचे एक लाडके व लोकप्रिय नेते स्व. अजित पवार यांच्या दुर्दैवी, अपघाती निधनाच्या शोकात्म पार्श्वभूमीवर ही पोटनिवडणुक होत आहे.
या पोटनिवडणुकीसाठी बारामती येथे येऊन आतापर्यंतच्या प्रघातानुसार मतदान करण्याचे मी ठरवले होते. दुर्दैवाने माझी प्रकृती बिघडल्याने मला मुंबईत रुग्णालयात दाखल व्हावे लागले. डॉक्टरांनी मला उपचार आणि सक्तीची विश्रांती या कारणास्तव मुंबईबाहेर जाण्यास मनाई केली आहे. त्यामुळे अत्यंत नाईलाजास्तव मतदानाचा हक्क बजावण्यापासून मला वंचित रहावे लागत आहे, हे मी अत्यंत व्यथित आणि खेदपूर्ण अंत:करणाने सांगू इच्छितो. माझ्यावर अथक प्रेम व विश्वास असलेले बारामतीचे नागरिक, मतदार व कार्यकर्ते मला समजुन घेतील याची मी खात्री बाळगतो.
रत्नागिरीकरांसाठी खुशखबर! उन्हाळी सुट्ट्यांसाठी एसटी सज्ज; तब्बल ‘इतक्या’ जादा बसेसचे नियोजन
आमच्या पक्षाने (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार) या पोटनिवडणुकीत श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना पाठिंबा जाहिर केला आहे. स्व. अजित पवार यांना ही एकप्रकारे आमच्या पक्षातर्फे श्रद्धांजलीच आहे. माझे बारामतीमधील सर्व मतदारांना आवाहन आहे की, त्यांनी श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करून स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करावी.
बारामतीमधील मतदार यांनी माझ्यावर प्रदीर्घ विश्वास ठेवलेला आहे. ते या आवाहनास प्रतिसाद देतील, असा मला विश्वास आहे.
मतदानासाठी प्रत्यक्ष न येता निवडणुक आयोगाच्या विविध पर्यायांचा देखील मी तपास केला व विचारणा केली. परंतु ते पर्याय उपलब्ध नसल्याचे राज्याच्या निवडणुक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. अखेर अतिशय व्यथित व जड अंत:करणाने मला मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय करावा लागला. या पोटनिवडणुकीत श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करावे, असे मी बारामतीकरांना पुन्हा एकदा आवाहन करतो.”
धन्यवाद !
मी १९६७ मध्ये लढविलेल्या पहिल्या निवडणुकीपासून बारामती मतदारसंघातील माझ्या मतदानाचा हक्क अखंडपणे बजावला. आता २०२६ मध्ये बारामती विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्राचे एक लाडके व लोकप्रिय नेते स्व. अजित पवार यांच्या दुर्दैवी, अपघाती निधनाच्या शोकात्म पार्श्वभूमीवर ही पोटनिवडणुक होत… — Sharad Pawar (@PawarSpeaks) April 21, 2026






