सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होण्याची दाट शक्यता आहे. या निवडणुकीच्या तयारीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आघाडी घेतली आहे. पक्षाचं मजबूत संघटन आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघात असलेल्या इच्छुकांची संख्या पाहता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशाने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांना हा अर्ज पैसे देऊन घ्यावा लागणार आहे. खुल्या प्रवर्गातल्या उमेदवाराला 10 हजार रुपये तर इतर प्रवर्गातल्या उमेदवाराला अर्ज घेण्यासाठी 5 हजार रुपये द्यावे लागणार आहेत.
पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून राष्ट्रवादी काँग्रेस भवन, शिवाजीनगर इथे हे अर्ज उपलब्ध आहेत. 29 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरपर्यंत सकाळी 10 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्याची मुदत आहे. इच्छुक उमेदवारांनी त्यांचा अर्ज दिलेल्या वेळेत जमा करावा, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून करण्यात येत आहे.
काँग्रेसचा अंतर्गत सर्व्हे
लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यातील सत्ताधारी महायुतीला मोठा दणका देत घवघवीत यश मिळवलं. अशातच आता राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. राज्यात लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकांमध्येही महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असाच सामना रंगणार आहे. अशातच आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं अंतर्गत सर्व्हे केला आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही काँग्रेस सर्वात मोठा पक्ष राहणार असल्याची शक्यता आहे, असा निष्कर्ष सर्वेक्षणातून आला आहे.
काँग्रेस पक्षानं केलेल्या अंतर्गत सर्व्हेनुसार, लोकसभेप्रमाणे विधानसभेतही काँग्रेसचं मोठा पक्ष राहणार आहे. सर्व्हेनुसार काँग्रेसला 85 जागा, शरद पवार गटाला 55 ते 60 जागा तर ठाकरे गटाला 32 ते 35 जागा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, काँग्रेसचा हा सर्व्हे आहे की, उद्धव ठाकरेंना इशारा आहे? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. यासंदर्भात राजकीय वर्तुळातही दबक्या आवाजात चर्चा सुरू आहेत.
काँग्रेसच्या सर्व्हेनुसार कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?
काँग्रेस : 85 जागा
भाजप : 55
राष्ट्रवादी शरद पवार गट : 55 ते 60
शिवसेना : 24
राष्ट्रवादी अजित पवार गट : 8 ते 9
शिवसेना उद्दव ठाकरे गट : 32 ते 35