शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यात एकूण 180 मंजूर पदांपैकी केवळ 156 पदे कार्यरत असून उर्वरित पदे अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत. डोंगराळ आणि दुर्गम भाग असलेल्या गगनबावडा तालुक्यात आधीच शैक्षणिक सुविधा मर्यादित असताना प्रशासनाने रिक्त पदे भरण्याकडे दुर्लक्ष केल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. तालुक्यातील शिक्षण व्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या केंद्रप्रमुखांच्या 5 पदांपैकी तब्बल 3 पदे रिक्त आहेत. त्यामुळे शैक्षणिक कामकाजाचे नियोजन आणि देखरेख यावरच परिणाम होत आहे. त्याचप्रमाणे गणित-विज्ञान विषयाच्या 15 पदांपैकी 5 पदे रिक्त, तर भाषा विषयाच्या 12 पदांपैकी 7 पदे रिक्त व अतिरिक्त 2पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या विषयांचे नियमित अध्यापन मिळत नसल्याची स्थिती आहे.
शालाबाह्य कामांचा वाढता बोजा; गुणवत्तेवर परिणाम
अध्यापक शिक्षकांच्या बाबतीतही परिस्थिती समाधानकारक नाहीं. 153 मंजूर पदांपैकी 139 शिक्षक कार्यरत असून 15 पदे रिक्त असल्यामुळे अनेक शाळामध्ये कमी शिक्षकांवर शिक्षणाची जबाबदारी टाकली जात आहे. काही ठिकाणी एका शिक्षकावर दोन ते चार वर्ग शिकवण्याची वेळ येत आहे.शिक्षकांवर शालाबाह्य कामांचा वाढता बोजा टाकला जात आहे. निवडणुका, जनगणना, विविध सर्वेक्षण, शासकीय मोहिमा अशा कामांमध्ये शिक्षकांना गुंतवून ठेवले जात असल्याने अध्यापनासाठी वेळच उरत नाही. परिणामी विद्याथ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर थेट परिणाम होत असल्याची खंत शिक्षण क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने अद्याप ठोस पावले उचललेली नाहीत. त्यामुळे रिक्त पदे तातडीने भरून शिक्षण व्यवस्थेला बळ द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
शिक्षक समायोजन, पर्यायी व्यवस्थेकडे दुर्लक्ष
तालुक्यात शिक्षण विभागातील रिक्त पदांचा प्रश्न गंभीर असतानाही शिक्षण प्रशासनाकडून ठोस उपाययोजना झालेल्या दिसत नाहीत. रिक्त पदे भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याबरोबरच तात्पुरत्या स्वरूपात शिक्षकांचे समायोजन किंवा पर्यायी व्यवस्था करण्याची गरज होती. मात्र अशा कोणत्या उपाययोजना प्रभावीपणे राबवल्या गेल्या नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. त्यामुळे या परिस्थितीचे खापर आता तालुका शिक्षण प्रशासनावर फुटत असल्याचे भावना व्यक्त होत आहे.






