'दानपेटी लुटणाऱ्यांसोबत जाणार का?' शरद पवारांच्या NDA चर्चांवर आदित्य ठाकरेंचा थेट सवाल
राज्यातील अलीकडील राजकीय घडामोडींमुळे महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील सहा खासदार आणि विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांना याबाबत मोठे विधान केले आहे.
याबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “मला वाटतं तो आमचा प्रश्न नाही, तो त्यांचा प्रश्न आहे. आम्ही आमचं मत स्पष्टपणे मांडत असतो. आज लोक महागाई, वीज, पाणीटंचाई यांसारख्या प्रश्नांवर उघडपणे बोलत आहेत आणि आपला राग व्यक्त करत आहेत.” त्यांनी या चर्चांवर अधिक भाष्य करण्याचे टाळत हा संबंधित पक्षाचा अंतर्गत विषय असल्याचे स्पष्ट केले.
यानंतर भाजपवर टीका करत आदित्य ठाकरे म्हणाले, “आज कोणताही पक्ष, आमदार, खासदार किंवा नगरसेवक अधिकृत किंवा अनधिकृतपणे भाजपसोबत जाण्याचा विचार करत असेल, तर त्यांनी स्वतःला एक प्रश्न विचारावा. जी लोकं राम मंदिराची दानपेटीही सोडत नाहीत, त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसणार का?” तसेच त्यांनी जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या अभिजीत दिपले आणि सोनम वांगचूक यांचाही उल्लेख करत, “देशासाठी आंदोलन करणाऱ्यांच्या विरोधात भाजपसोबत जाणार का?” असा सवाल उपस्थित केला.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. राष्ट्रवादी आणि भाजपच्या काही नेत्यांच्या भेटी झाल्याच्याही चर्चा आहेत. मात्र, या विषयावर अद्याप कोणत्याही पक्षाकडून अधिकृत घोषणा किंवा पुष्टी करण्यात आलेली नाही.
राज्यातील राजकीय वातावरणात सध्या मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. आधी शिवसेना ठाकरे गटातून खासदार फुटल्यानंतर आता महाविकास आघाडीमधूनही आमदार आणि खासदार फुटणार असल्याच्या चर्चाना वेग आला आहे. अश्यातच आता राष्ट्रवादी शरद पवार गटही भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात राज्यातील राजकारणात आणखी काय घडामोडी होतात हे पाहणारे महत्वाचे ठरणार आहे.






