कोल्हापुरात कर्नाटकच्या बस वाहतुकीला अडथळा
कर्नाटक सरकारच्या दडपशाहीविरोधात उद्धवसेनेचे आंदोलन
महाराष्ट्र – कर्नाटक राज्यांची वाहतूक विस्कळीत
हजारो प्रवाशांना बसला मोठा फटका
कोल्हापूर: कर्नाटक सरकारकडून (Karnataka Government) सीमा भागातील मराठी भाषिकांवर कथित अन्याय व दडपशाही होत असल्याच्या निषेधार्थ उद्धवसेनेने कोल्हापुरात (Kolhapur) कर्नाटकची प्रवासी वाहतूक रोखून तीव्र आंदोलन छेडले. मध्यवर्ती बसस्थानकात घेतलेल्या आंदोलनामुळे महाराष्ट्र–कर्नाटक या दोन्ही राज्यांची वाहतूक दिवसभर विस्कळीत झाली असून हजारो प्रवाशांना मोठा फटका बसला. सकाळी अकरा वाजता उद्धवसेनेतर्फे कोल्हापूर बसस्थानकात आंदोलनास सुरुवात झाली.
बसस्थानकात येणाऱ्या कर्नाटक परिवहन मंडळाच्या बस रोखण्यात आल्या. बसमधील प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. त्या बसवर ‘जय महाराष्ट्र’ अशा फलकांचे प्रात्यक्षिक लावण्यात आले. कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या.
सीमा प्रश्नावर कर्नाटक सरकारने घेतलेल्या भूमिकेचा निषेध करत आंदोलनकर्त्यांनी मराठी जनतेला न्याय देण्याची मागणी केली.
उद्धवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे म्हणाले, “कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मराठी जनतेची सार्वजनिक माफी मागावी. अन्यथा अधिवेशन काळात कर्नाटक सरकारमधील मंत्र्यांना महाराष्ट्राच्या हद्दीत पाऊल ठेवू देणार नाही.” तसेच त्यांनी राज्य परिवहन विभागाचे अधिकारी अभय देशमुख यांना कर्नाटकची वाहतूक बंद करण्याची मागणी करत पुन्हा मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. उपनेते संजय पवार यांसह अवधूत साळोखे, मंजीत माने, चंद्रकांत भोसले, अनिकेत घोटणे, दिनमहमंद शेख, संजय जाधव, संतोष रेडेकर, पंपू कोंडेकर, गोविंद वाघमारे आदी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
मराठी-कन्नड वाद चिघळणार? कर्नाटकात मराठीची गळचेपी! नेत्यांची धरपकड, ST सेवाही बंद अन्…
आंतरराज्य करारानुसार दररोज कर्नाटकच्या १०० पेक्षा अधिक बसेस महाराष्ट्रात येतात. आंदोलनामुळे— निपाणी, संकेश्वर, हत्तरगी, बेळगाव, सौंदत्ती आदी मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. कर्नाटकची बस सेवाही सुरळीत झाली नव्हती.एसटी बस कोगनोळी टोल नाक्यापर्यंतच धावत होत्या. रोजच्या तुलनेत ५० बसांची वाहतूक बाधित झाली.
सीमाभागातील प्रवाशांनी अंतर्गत मार्गांचा वापर करून प्रवास सुरू ठेवण्याचा पर्याय निवडला. तथापि राष्ट्रीय महामार्गावरून जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत राहिली. या आंदोलनामुळे महाराष्ट्र–कर्नाटक सीमा वाद पुन्हा एकदा तापला आहे. मराठी भाषिकांवरील अन्यायाचा आरोप करत उद्धवसेनेने कर्नाटक सरकारला थेट इशारा दिला असून, पुढील काही दिवसांत या वादाचा स्वरूप अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. वाहतूक विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय आणि दोन्ही राज्यांतील तणाव — कर्नाटक सरकारविरोधातील या आंदोलनामुळे सीमा प्रश्नाचा पुन्हा ऐरणीवर आलेला दिसतो.






