सातारा : सातारा शहराच्या अस्मितेचा बिंदू असणाऱ्या सातारा नगरपालिकेची निवडणूक तब्बल साडेतीन वर्षांनंतर अखेर जाहीर होण्याच्या मार्गावर आली आहे. प्रशासकांच्या राज्यात विकासाचे दावे झाले असले तरी प्रत्यक्षात पायाभूत सुविधांचा लाभ सातारकरांना किती मिळाला, यावर प्रश्नचिन्ह आहे. दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मनोमिलनाच्या चर्चांना वेग आला आहे. दोघांमधील सहकार्य की मैत्रीपूर्ण लढत, हे समीकरण अजून स्पष्ट झालेले नाही. इच्छुकांना संधी न मिळाल्यास बंडखोरीचा भडका उडू शकतो, अशी चर्चा आहे.
अंतिम मतदार यादी आणि निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरच या ‘राजकीय लग्नघटके’ ची निश्चिती होणार आहे.खासदार उदयनराजेंनी नुकतेच “ज्याचे काम चांगले, त्यालाच संधी मिळेल” असे सूतोवाच केले. त्यामुळे यावेळी आरक्षण, कामगिरी आणि नव्या चेहऱ्यांचा समन्वय हाच निकष ठरणार आहे. हद्दवाढ भागातून दहा नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. 2019 च्या निवडणुकीत सातारा विकास आघाडीने 22, नगर विकास आघाडीने 12आणि भाजपने 6 नगरसेवक निवडून आणले होते. गेल्या पाच वर्षांत दोन्ही आघाड्यांतील अंतर्गत कलहामुळे भाजपचे कार्यकर्ते गोंधळलेल्या अवस्थेत राहिले. मात्र आता दोन्ही राजे भाजपमध्ये असल्याने पक्षातील निष्ठावंतांना संधी मिळणार का, हा नवा प्रश्न निर्माण झाला आहे. महायुतीचा फॉर्म्युला कायम राहिला तर अजित पवार गट आणि शिंदे गटालाही काही जागा द्याव्या लागतील; मात्र साताऱ्यात त्यांची ताकद मर्यादित असल्याने जागावाटपाचे समीकरण गुंतागुंतीचे ठरण्याची शक्यता आहे.
याचबरोबर सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत| महाविकास आघाडीही सज्ज होत आहे. बंडखोरांना चुचकारत भाजपविरोधी लाट निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. राष्ट्रवादी – शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू केल्या असून स्थानिक स्तरावर पक्षाची मोट बांधण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. 50 प्रभागांमधूनसुमारे 500 उमेदवारांची नावे समोर येण्याची शक्यता आहे. त्यातील निवडक उमेदवार ठरवताना दोन्ही राजांचा आणि विरोधकांचा खरा कस लागणार आहे.






