'अजित पवार यांच्या नावाला विरोध नाही, पण...'; अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयाच्या नावावरून हाके आक्रमक (संग्रहित फोटो)
बारामती : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाला आमचा विरोध नाही. मात्र, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या नावामध्ये खाडाखोड केल्यास जनसागर उसळेल, असा शासनाने रुग्णालयाच्या नावामध्ये कोणताही बदल करू नये, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी बोलताना दिला.
बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शासकीय सर्वोपचार रुग्णालयाला स्व. अजित (दादा) पवार यांचे नाव देण्याचा अध्यादेश राज्य सरकारने काढल्याने धनगर समाजाच्या वतीने या निर्णयाबद्दल तीव्र निषेध व्यक्त करून हा अध्यादेश फाडण्यात आला. यावेळी प्रा. हाके यांच्या नेतृत्वाखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी हे आंदोलन करण्यात आले.
हेदेखील वाचा : Latur News: ई-चलन दंडाविरोधात लातूरमध्ये वाहतूकदारांचा चक्का जाम; चुकीचे ई-चलन रद्द करण्याची मागणी
यावेळी प्रा. हाके म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यादेवींचे त्रिशत्कोत्तर जयंती महोत्सवी वर्ष असल्याने, बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवींचे नाव देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार या महाविद्यालयाला व रुग्णालयाला अहिल्यादेवींचे नाव देण्यात आले. काही दिवसांपूर्वी राज्याचे नेते अजितदादांचे दुर्दैवी अपघाती निधन झाले. त्यांच्या या अपघाती निधनामुळे सामान्य माणसाला मोठे दुःख झाले आहे, त्या भावना नक्कीच आम्ही समजू शकतो. त्यामुळे दिवंगत नेते अजित पवार यांच्या नावाला आमचा विरोध नाही.
वास्तविक, पाहता अजितदादांचे नाव द्यायचे असेल तर बारामती कृषी विज्ञान केंद्राला, बारामती विमानतळाला द्यावे. मात्र, वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला अहिल्यादेवींचे नाव असताना शासकीय रुग्णालयाला अजितदादांचे नाव देण्याचा अट्टाहास का?, असा सवाल प्रा. हाके यांनी यावेळी केला. या नावामध्ये खडाखोड करण्याचा प्रयत्न झाला, तर संपूर्ण महाराष्ट्र मध्ये तीव्र आंदोलन होईल. त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, बारामती हेच नाव कायम राहिले पाहिजे. यामध्ये शासनाने कोणताही बदल करण्याचा प्रयत्न करू नये. या भावना राज्यातील ओबीसी सह सर्व समाज घटकांच्या आहेत, असे हाके यांनी सांगितले.
यावेळी नवनाथ पडळकर, ॲड गोविंद देवकाते, बापूराव सोलनकर यांच्यासह इतरांनी अहिल्यादेवी होळकर यांचे नाव असताना या शासकीय रुग्णालयाला अन्य नामकरण केल्यास आम्ही आणखी तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला. यावेळी तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उज्वला हाके, कल्याणी वाघमोडे, संपतराव टकले, निलेश धालपे, देवेंद्र बनकर आदींसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






