मुंबई : शिवसेनेच्या 16 आमदारांच्या (Shivsena MLA) अपात्रतेच्या निर्णय प्रक्रियेला वेग आला आहे. शिवसेनेच्या 40 तर ठाकरे गटाच्या 14 आमदारांना नोटीस (Notice to Shivsena MLA) पाठवण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी ही नोटीस बजावली आहे. दोन्ही गटातील आमदारांना सात दिवसांमध्ये उत्तर देण्याचे निर्देशही त्यांनी नोटिसीमार्फत दिले आहेत.
ठाकरे गटाने नुकतेच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत अपातत्रेसंदर्भात लवकर निर्णय घेण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली. त्यामुळे आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आमदार अपात्रतेसंदर्भात कायदेशीर बाबी तपासण्याकरिता यापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेची घटना, पक्षप्रमुख कोण याबाबतची माहिती मागविली होती.
धाकधूक वाढली
अपात्रतेच्या कारवाईला त्यामुळे आता वेग येणार आहे. शिंदे गटाचे आमदारांची यामुळे धाकधूक वाढली आहे. शिवसेनेच्या घटनेची प्रत विधानसभा अध्यक्षांनी निवडणूक आयोगाकडून मागवली होती. मागील आठवड्यात ही प्रत विधानसभा कार्यालयाकडे प्राप्त झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेत फूट पडण्यापूर्वी पक्ष कोणाचा होता. यावर निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.
ठाकरे गट पुन्हा सुप्रीम कोर्टात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील गटाला शिवसेना हे पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात सादर केली असून, तत्काळ सुनावणीची मागणी केली आहे. या याचिकेत मुख्यमंत्री शिंदेचा गट शिवसेनेचे प्रतीक असलेल्या धनुष्यबाणाचा गैरवापर करीत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप आहे.