राज्य सकारची लष्कराच्या तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक; मुंबईसंदर्भात महत्त्वाची चर्चा
Maharashtra Government Meeting : भारत पाकिस्तानने युद्धबंदीची घोषणा केली असली तरी धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे भारतीय आर्मी, हवाई दल आणि नौदल सीमेवर कार्यरत आहेत. दरम्यान राज्यांच्या सीमा सुरक्षित रहाव्यात यासाठी सकारकडून प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्र गुजरातच्या सीमेला लागून आहे. इथून पाकिस्तानची सीमा जवळ आहे. शिवाय भारताची आर्थिक राजधानी मुंबईलाही धोका आहे. त्यामुळे राज्य सरकारने आज लष्कराच्या तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील ‘वर्षा’ निवासस्थानी आज ही बैठक पार पडली. बैठकीला भारतीय लष्कराचे महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा विभागाचे कमांडिंग जनरल ऑफिसर, भारतीय नौदलाचे महाराष्ट्र नौदल फ्लॅग ऑफिसर कमांडिंग, भारतीय हवाई दलाचे एअर व्हाइस मार्शल, महाराष्ट्र सरकारचे मुख्य सचिव, महाराष्ट्राचे डीजीपी, गृह आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या बैठकीला उपस्थित होते.
CM Devendra Fadnavis chairs a meeting at his official residence ‘Varsha’ in Mumbai, regarding Civil-Military Coordination with Indian Army’s General Officer Commanding Maharashtra, Gujarat and Goa Area, Indian Navy’s Flag Officer Commanding Maharashtra Naval Area, Indian… pic.twitter.com/MLJSKVSMXb
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 12, 2025
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, नागरी सुरक्षेच्या संदर्भात आज वर्षा निवासस्थानी बैठक घेण्यात आली. सध्या भारत पाकिस्तानमध्ये तणाव असून या युद्धजन्य परिस्थितीत महाराष्ट्र सरकारच्या विविध विभागांची बैठक घेण्यात आली. मात्र लष्कराच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली नव्हती. ती बैठक आज घेण्यात आली. या बैठकीत अशा परिस्थितीत आपण आपण अधिक काय करायची गरज आहे. भविष्यातही आपण कसं सतर्क राहिलं पाहिजे आणि यादृष्टीने सैन्यदलाच्या आमच्याकडून काय अपेक्षा आहेत, यावर सविस्तर चर्चा करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
भारतासोबत युद्ध जिंकू शकत नाही हे पाकिस्तानलाही माहिती आहे. त्यामुळे ते प्रॉक्सी वॉर सुरू करून दहशतवादारारख्या कारवाया घडवून आणण्याचा प्रयत्न करतात. त्यातच मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे मुंबई शहर संवेदनशील असल्याचंही त्यांनी सांगितलं.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबईला सातत्याने लक्ष्य केलं जातं, त्यामुळे त्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. सीमेवर चोख प्रत्युत्तर दिलंय, त्याबद्दल मी तिन्ही दलांचं अभिनंदन करतो. पाकिस्तानने भारताला त्रास देणं सोडून स्वतःच्या लायकीत राहून काम केलं पाहिजे, असं ते म्हणाले.