Maharashtra Kolhapur Sangli People Protest Against Increase Height Almatti Dam Karnataka Government Decision
Almatti Dam: अलमट्टी धरणाचा मुद्दा तापणार! रविवारी अंकली टोलनाक्यावर…
रविवार, १८ मे रोजी अंकली टोल नाक्यावर चक्काजाम आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. हे आंदोलन सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने होत आहे. अलमट्टी धरणाची उंची वाढल्यास महापुराचा धोका वाढणार आहे.
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा कर्नाटकचा निर्णय (फोटो- istockphoto)
Follow Us:
Follow Us:
शिरोळ /सुरेश कांबळे शिरोळ तालुक्याच्या राजकारणात कायम स्पर्धा, कटुता, आणि परस्पर विरोध याची ठसठशीत छाप असते. कोणतीही निवडणूक असो – आपला पक्ष, आपला उमेदवार आणि आपले कार्यकर्ते यांना विजयी करण्यासाठी चालणारी चुरस ही इर्षा तेढ निर्माण करणारी ठरते. परंतु गेल्या काही दिवसांत या राजकीय वातावरणात नवा बदल घडताना दिसत आहे. अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीविरोधात शिरोळ तालुक्यातील सर्वपक्षीय नेते, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते एकत्र येत आहेत.
रविवार, १८ मे रोजी अंकली टोल नाक्यावर चक्काजाम आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. हे आंदोलन सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने होत आहे. अलमट्टी धरणाची उंची वाढल्यास महापुराचा धोका वाढणार आहे, आणि याचा सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्याला बसतो, ही या आंदोलनामागील प्रमुख भावना आहे.
मागील काही वर्षांतील महापुरांचा अभ्यास घेतला असता २००५, २०१९, २०२१ आणि २०२४ या वर्षांमध्ये शिरोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती उद्भवली होती. हजारो लोकांचे स्थलांतर, शेतीचे नुकसान, घरे उद्ध्वस्त होणे, जीवित्तहानी आणि जनावरांचा मृत्यू या घटनांनी लोकजीवन उध्वस्त केले होते. स्थानिक लोकांच्या मते, या पुरामागे अलमट्टी धरणाचे नियोजन हे महत्त्वाचे कारण ठरले आहे.
या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतल्याने शिरोळकरांची चिंता वाढली आहे. ही धोक्याची घंटा ओळखून तालुक्यातील सर्वपक्षीय नेते एकत्र येत आहेत. या नेत्यांमध्ये प्रमुख आहेत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, उद्यान पंडित गणपतराव पाटील आणि माजी आमदार उल्हास पाटील. माझी बांधकाम सभापती सावकार मादनाईक या नेत्यांमध्ये याआधी राजकीय इर्षा होती, निवडणुकीतील जय पराजय उफाळून येत होता. परंतु अलमट्टीच्या मुद्द्यावर त्यांनी आपली राजकीय मतभेद बाजूला ठेवून जनहितासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलन अंकुश चे प्रमुख धनाजी चुडमुंगे सुरुवातीपासूनच सक्रिय झाले आहेत.
गावोगावी बैठका, जनजागृती मोहीम, पूरग्रस्तांचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याचे काम सध्या या नेत्यांनी सुरू केले आहे. तालुक्यात विविध ठिकाणी दौरे करून अलमट्टी उंचीवाढीमुळे होणारे नुकसान समजावून सांगण्यात येत आहे. त्यामुळे ही लढाई केवळ राजकीय न राहता जनतेचीही बनली आहे. रविवारी होणाऱ्या चक्काजाम आंदोलनात हजारोंच्या संख्येने जनतेचा सहभाग अपेक्षित आहे. हे आंदोलन केवळ एक निषेध नसून शिरोळ तालुक्याच्या भविष्याची लढाई आहे, अशी भावना सर्वत्र दिसून येत आहे.
या ऐतिहासिक एकीमुळे शिरोळ तालुक्याच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू झाला आहे. मतभेदांना बाजूला ठेवून सर्व नेते एका उद्दिष्टासाठी एकत्र येत आहेत, हे लोकशाहीच्या दृष्टीने निश्चितच सकारात्मक पाऊल आहे. युवा कार्यकर्त्यांसाठी ही एक नवी शिकवण ठरत आहे – की राजकारण केवळ निवडणुकीपुरते मर्यादित न ठेवता, लोकहितासाठीही वापरले जाऊ शकते. एकंदरीत सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी 18 मे रोजी होणारे चक्काजाम आंदोलन यशस्वी करण्यासाठी जोरदार रान उठविले आहे.
Web Title: Maharashtra kolhapur sangli people protest against increase height almatti dam karnataka government decision