Maharashtra Winter Session: राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास आजपासून सुरूवात; सरकारकडून कोणत्या घोषणा होणार?
सात दिवस चालणाऱ्या या अधिवेशनाकडून राज्यातील जनता, विशेषत: शेतकरी आणि विदर्भातील नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या मांडल्या जाणार असून शासकीय कामकाज पार पडेल. त्यानंतर शोकप्रस्ताव मांडला जाईल आणि दिवसाचे कामकाज स्थगित केले जाईल. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. त्यामुळे या निवडणुकांचा प्रभाव पुरवणी मागण्यांवर पडतो का, तसेच सरकारकडून काही नवीन घोषणा होतात का, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. (Maharashtra politics)
अधिवेशनादरम्यान शेतकऱ्यांची कर्जमाफी, अतिवृष्टीमुळे झालेली भरपाई, शेतकरी आत्महत्या आणि इतर महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांत काही नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत, यावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे, त्यामुळे ऐन थंडीत अधिवेशन तापण्याची शक्यता आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षनेत्यांनी मात्र बहिष्कार टाकला. अधिवेशनाच्या एक दिवस आधी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर जोरदार टिका केली.
विधीमंडळातील विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवण्याच्या मुद्द्यावरुन विजय वडेट्टीवार आणि भास्कर जाधव यांनी सरकारवर कडाडून टीका केली. विरोधी पक्षनेतेपद रिक्त ठेवणं हा संविधानाचा अपमान असून, सरकारला विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली.
राज्यात दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेता नसल्याबाबत विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. “विरोधी पक्षनेत्यांची निवड ही सर्वस्वी अध्यक्ष आणि सभापतींच्या अखत्यारीत येते. त्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असेल. या बाबतीत आमचा कोणताही आग्रह किंवा दुराग्रह नाही,” असे फडणवीस म्हणाले.
यंदाच्या हिवाळी अधिवेशनात शनिवार आणि रविवारीही कामकाज पार पडणार आहे. नागपूर अधिवेशनात दररोज १० तासांपेक्षा जास्त कामकाज करण्याचा शासनाचा प्रयत्न राहील. या अधिवेशनात १८ विधेयके मांडली जाणार असून विदर्भ आणि मराठवाडा या दोन्ही प्रदेशांशी संबंधित मुद्द्यांवर विशेष चर्चा होईल. दावोससह विविध मंचांवर झालेले गुंतवणूक करार मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्षात उतरू लागले आहेत आणि हे उद्योग महाराष्ट्रात स्थापन होत आहेत.






