माणगाव : सर्पदंश झाल्याने २२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना माणगाव तालुक्यात घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माणगांव तालुक्यातील बामणोली ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या कळमजे गावातील एका २२ वर्षीय होतकरू तरुणाचे दिनांक ५ सप्टेंबर रोजी सर्पदंशाने दुःखद निधन झाले आहे. ऋतिक संजय वाढवळ असे मृत तरुणाचे नाव असून ऋतिक आपल्या शेतात नेहमीप्रमाणे दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास काम करत असताना त्याला विषारी सापाने दंश केला. त्याला उपचारासाठी तात्काळ माणगांव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र ऋतिकचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अवघ्या २२ वर्षीय ऋतिकच्या अकाली जाण्याने वाढवळ या शेतकरी असलेल्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. मनमिळाऊ आणि होतकरू तरुण आपल्या शेतात काम करून कुटुंबाला हातभार लावत होता. या दुःखद घटनेमुळे संपूर्ण कळमजे गाव आणि पंचक्रोशी तसेच आप्तेष्ट नातेवाइकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची नोंद माणगाव पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी अधिक तपास माणगावचे पोलीस अधीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.