राज्यात 98 टक्के पावसाचा अंदाज (फोटो- chatgpt)
सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडण्याची शक्यता
पावसाचे वितरण असमान राहणार
ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिला इशारा
सुनयना सोनवणे /पुणे: महाराष्ट्रात यंदाच्या मान्सून हंगामात सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पपडण्याची शक्यता असली तरी पावसाचे वितरण असमान राहणार असून अनेक भागांत मोठे पावसाचे खंड पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक नियोजन करताना विशेष काळजी घ्यावी, असा इशारा ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिला.
माजी विभागप्रमुख, कृषी हवामानशास्त्र विभाग तथा कृषी हवामान फोरम साऊथ एशियाचे संस्थापक सदस्य असलेल्या डॉ. साबळे यांनी पत्रकार परिषदेत २०२६ चा मान्सून अंदाज जाहीर केला. मान्सूनचा अंदाज वर्तविण्याचे हे त्यांचे सलग २४ वे वर्ष आहे. त्यांनी सांगितले की, जून ते सप्टेंबर या कालावधीत पडणाऱ्या मान्सून पावसावर राज्यातील सुमारे दीड कोटी शेतकरी अवलंबून आहेत. हवामान बदल, वाढते हरितगृह वायू, जंगलतोड आणि जागतिक स्तरावरील प्रदूषणामुळे मान्सूनच्या स्वरूपात सातत्याने बदल होत आहेत. यंदा राज्यात सरासरीच्या जवळपास पाऊस होण्याचा अंदाज असला तरी कमी दिवसांत अधिक पाऊस आणि त्यानंतर दीर्घ खंड असे चित्र राहण्याची शक्यता आहे.
विभागनिहाय अंदाजानुसार पश्चिम विदर्भात ९७ टक्के, मध्य विदर्भ व मराठवाड्यात १०० टक्के, पूर्व विदर्भात ९६ टक्के, उत्तर महाराष्ट्रात ९६ टक्के, पश्चिम महाराष्ट्रात ९७.६ टक्के आणि कोकणात सरासरीइतका पाऊस अपेक्षित आहे. पुणे, नागपूर, यवतमाळ, परभणी आणि दापोली येथे सरासरीइतका पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Maharashtra Rain Alert: दोन दिवस छत्री घेऊनच फिरा; वादळी वारे अन्…; IMD ने दिला ‘हा’ इशारा
मात्र दापोली, पुणे, अकोला आणि यवतमाळ येथे लहान खंड, कराड, पाडेगाव व निफाड येथे मध्यम खंड, तर राहुरी, कोल्हापूर, सोलापूर, धुळे, जळगाव, परभणी आणि नागपूर भागात मोठे खंड पडण्याची शक्यता असल्याचे डॉ. साबळे यांनी सांगितले. काही भागांत आवर्षणसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते; मात्र नंतर पावसाच्या पुनरागमनाची शक्यता राहील. यंदा एल निनो किंवा सुपर एल निनोचा प्रभाव नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र वाऱ्याचा वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी तुलनेने कमी असल्याने पावसाचे वितरण विस्कळीत राहू शकते, असे त्यांनी नमूद केले.
शेतकऱ्यांसाठी डॉ. साबळे यांचा सल्ला –
– कमी कालावधीत उत्पादन देणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावे.
– सोयाबीन, मूग, उडीद, मटकी, चवळी, बाजरी आणि ज्वारीची निवड करावी.
– कापूस, ऊस, हळद आणि आले यांसारखी अधिक पाणी लागणारी पिके टाळावीत.
– ठिबक सिंचनाचा वापर वाढवावा.
– बाजरी-तूर, तूर-भुईमूग, कापूस-मूग अशी आंतरपीक पद्धत अवलंबावी.
– किमान ६५ मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी.
– जमिनीत दोन ते तीन फूट ओल गेल्यानंतर पेरणी करणे योग्य.
– कोकणात दोन टप्प्यांत लागवड करून आवश्यकतेनुसार पुनर्पेरणी करावी.
Maharashtra Rain Alert: यंदा वरुणराजाची अवकृपा? हवामान खात्याने वर्तवला ‘हा’ धोक्याचा इशारा
ठळक मुद्दे –
– राज्यात सरासरीच्या ९८ टक्के पावसाचा अंदाज
– मोठ्या धरणे पूर्ण क्षमतेने भरण्याबाबत अनिश्चितता
– कमी दिवसांत जास्त पाऊस, नंतर मोठे खंड
– एल निनोचा सध्या प्रभाव नाही
– इंडियन ओशन डायपोल (आयओडी)सद्यस्थितीत तटस्थ.
– हवामान बदलाचा मान्सूनवर वाढता परिणाम






