राज्याला पावसाचा इशारा (फोटो- istockphoto)
राज्यातील अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
पुढील दोन दिवस वादळी पावसाचा अंदाज
हलक्या ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता
पुणे: राज्यातील विविध भागांत पुढील दोन दिवस वादळी पाऊस, मेघगर्जना आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भ आणि लगतच्या तेलंगणा राज्यावर ०.९ किलोमीटर उंचीवर चक्राकार स्थिती कायम असून नैऋत्य मोसमी पावसाची उत्तर सीमा अद्याप स्थिर आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता. १) राज्यभर तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. राज्यातील अनेक भागांत मेघगर्जना, वादळी वारे आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
अहिल्यानगर, सातारा, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वाशिम जिल्ह्यांत पावसाचा अंदाज असून, छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यांतही मेघगर्जना आणि वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. धुळे, नाशिक घाट विभाग, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत गारपिटीसह वादळी पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड तसेच विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना मेघगर्जना, हलका पाऊस आणि काही ठिकाणी उष्ण व दमट हवामानाच्या पार्श्वभूमीवर यलो अलर्ट देण्यात आला आहे.
Maharashtra Rain Alert: यंदा वरुणराजाची अवकृपा? हवामान खात्याने वर्तवला ‘हा’ धोक्याचा इशारा
पुणे शहर आणि परिसरात पुढील दोन दिवस हवामान मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता असून दुपारनंतर किंवा सायंकाळी आकाश अंशतः ढगाळ होऊ शकते. रविवारी शहरात कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २५.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. सोमवारी कमाल तापमान ३७ अंशांवर स्थिर राहण्याची, तर किमान तापमान २५ अंशांपर्यंत किंचित घटण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
दरम्यान, ३ जूननंतर पुणे आणि परिसरात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
भारतीय हवामान विभागाने जाहीर केलेल्या २०२६ च्या नैऋत्य मोसमी पावसाच्या अद्ययावत दीर्घकालीन अंदाजानुसार, यंदा देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जून ते सप्टेंबर या मान्सून हंगामात देशभरातील पर्जन्यमान दीर्घकालीन सरासरीच्या सुमारे ९० टक्के राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असून, सरासरीपेक्षा कमी मान्सूनची शक्यता अधिक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या अंदाजात चार टक्के त्रुटीची मर्यादाही नमूद करण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या मल्टी मॉडेल एन्सेंबल प्रणालीच्या आधारे तयार करण्यात आलेल्या या अंदाजानुसार, मध्य भारत, दक्षिण द्वीपकल्प आणि वायव्य भारतात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. तर ईशान्य भारतात पाऊस सामान्य राहू शकतो. देशातील बहुतांश पावसावर अवलंबून असलेल्या कृषी क्षेत्रांचा समावेश असलेल्या ‘मॉन्सून कोअर झोन’मध्येही कमी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे खरीप हंगाम, जलसाठे, जलविद्युत निर्मिती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






