सौजन्य - नवराष्ट्र टीम
वडूज : संपूर्ण महाराष्ट्र तसेच सातारा जिल्ह्यासह माण, खटाव विधानसभा मतदारसंघात गेल्या आठ ते दहा दिवसांत झालेली अतिवृष्टी व त्यानंतर आलेल्या पुरामुळे शेती, पिके, घरांची अनेक ठिकाणी झालेली पडझड ,पशुधन तसेच रस्त्यांचे नुकसान आदींची पाहणी ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शुक्रवार केली.
यामध्ये कुळकजाई, मलवडी, भांडवली, आंधळी, टाकेवाडी, म्हसवड, पळशीसह माण मतदार संघातील इतर ठिकाणी अतिवृष्टी व नुकसानग्रस्त भागाची पाहणी मंत्री जयकुमार गोरेंनी करून पिकांचे नुकसान झालेले शेतकरी व अतिवृष्टीमुळे घरांच्या पडझडी झालेल्या नुकसान ग्रस्त नागरिकांच्या भेटी घेतल्या. या अतिवृष्टीमुळे गावोगावी शेतीपिकांचे नुकसान झाले आहे तर अनेक ठिकाणी दळणवळणासाठी महत्वाचे असलेले पूल वाहून गेले आहेत. त्या पुलांची व रस्त्यांच्या दुरुस्तीच्या सूचना मंत्री जयकुमार गोरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
पळशी तालुका माण येथील नवनाथ पाटोळे यांचा माणगंगा नदीवरील बंधाऱ्यावरून पुराच्या पाण्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्या निवासस्थानी भेट दिली व त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून शासनाकडून योग्य ती मदत देण्याचे आश्वासन दिले.
म्हसवड येथील पूरग्रस्त भागाची पाहणी करून खचलेल्या रस्त्याचं झालेले नुकसान आणि विविध भागातील पिकांच्या नुकसानीची पाहणी करून प्रशासनाला आवश्यक त्या सूचना करून तातडीने कार्यवाही करण्याचे आदेशही गोरे यांनी यावेळी दिले.
नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांच्या व नागरिकांच्या भेटीदरम्यान त्यांना झालेल्या नुकसानीची शासनाकडून अधिकाधिकमदत मिळवून देतानाच सोबत असलेले वरिष्ठ अधिकारी, तहसीलदार प्रतिनिधी, तलाठी, मंडळ अधिकारी व अन्य प्रशासकीय यंत्रणेला शेतकरी बांधवांच्या नुकसानीची योग्य व सरसकट नोंद घेण्याच्या सूचना केल्या.
यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, जिल्हा कृषी अधिक्षक भाग्यश्री फरांदे, प्रांत उज्वला गाडेकर, तहसिलदार विकास अहिर, मुख्याधिकारी सचिन माने, गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे, अधिक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, बांधकामसह शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, पाहणी दौऱ्यातील विविध गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.
परिस्थिती भयंकर असली तरी शेतकरी व नागरिकांनी खचून न जाता धैर्याने सामोरे जाण्याचे आवाहन करत अतिवृष्टीसारख्या अस्मानी संकटामुळे झालेल्या शेती, पिक व अन्य नुकसानीची मतदारसंघातील नागरिकांना अधिकाधिक मदत मिळावी, यासाठी तत्काळ पाठपुरावा केला असून त्वरित नुकसान भरपाई देण्याचे आदेश मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रशासनाला दिलेले आहेत.