मुंबई : अनंत गीते यांना पाच-सहा वेळा रायगड लोकसभेचे खासदार म्हणून नेतृत्व करण्याची, त्याचबरोबर मंत्रिपद भूषविण्याची संधी मिळाली. गीतेंनी आपल्या कारकिर्दीत कोणती विकासाची कामे केली, केंद्राच्या माध्यमातून कोणते मोठे प्रकल्प आणले हे त्यांनी रायगडच्या जनतेसमोर मांडावे, असे आव्हानच भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी दिले आहे.
रायगड लोकसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ आज महाड विधानसभेतील मुंबईवासियांचा जाहीर मेळावा पार पडला. या मेळाव्यात आमदार दरेकर बोलत होते. याप्रसंगी महाडचे शिवसेना आमदार, प्रतोद भरत गोगावले, रायगड जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख अरुण चाळके, रायगड जिल्हा शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज घोसाळकर, भालचंद्र शिरसाट, अविनाश जाधव, गजानन पवार, इकबालशेख चांदे, राज पार्टे, यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आपल्या भाषणात बोलताना दरेकर म्हणाले की, कोकणातील शिवसेनेचे जे आमदार, खासदार निवडून आले आहेत त्यांना निवडून आणण्यात मुंबईकर कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा होता. म्हणून सुनील तटकरे यांच्या निवडणुकीच्या निमित्ताने हा मेळावा अत्यंत महत्वाचा आहे. ही निवडणूक केवळ लोकसभेची नाही तर देशाकरिता होणारी निवडणूक आहे. ही निवडणूक तिसऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत यासाठी आहे. देशाचे भविष्य घडविणारी ही निवडणूक आहे. खऱ्या अर्थाने देशाला विकसित भारत करायचे असेल, उद्याच्या पिढ्यांचे भविष्य सुरक्षित करायचे असेल त्या दृष्टीनेही ही निवडणूक अत्यंत महत्वाची असल्याचे दरेकर म्हणाले.
दरेकर पुढे म्हणाले की, रायगड लोकसभा क्षेत्रात केवळ एक आमदार सोडला तर पाचही आमदार हे आपल्या महायुतीचे आहेत. या आमदारांनी सरकारच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघात विकासाची कामे मोठ्या प्रमाणावर केली आहेत. एवढे सगळे नेते, आमदार असताना अनंत गीते यांची डाळ आपल्यासमोर कशी काय शिजणार हा प्रश्न आहे. अनंत गीते यांना पाच-सहा वेळा लोकसभेचे खासदार म्हणून नेतृत्व करण्याची, त्याचबरोबर मंत्रिपद भूषविण्याची संधी मिळाली. गीतेंनी आपल्या कारकिर्दीत कोणती विकासाची कामे केली, केंद्राच्या माध्यमातून कोणते मोठे प्रकल्प आणले हे त्यांनी रायगडच्या जनतेसमोर मांडावे, असे आव्हानच दरेकर यांनी गीतेंना दिले.
दरेकर पुढे म्हणाले की, सुनील तटकरे यांनी रायगडचे पालकमंत्री, खासदार म्हणून असो आणि आमचे जे आमदार आहेत. त्यांच्या माध्यमातून झालेली लोकहिताची कामे याची तुलना केली तर एक टक्का पण कामे गीते किंवा उबाठा गट करू शकले नाहीत. ही निवडणूक केवळ तटकरेंना खासदार बनविण्यासाठी नाही तर या देशाचा पंतप्रधान कोण बनणार हे ठरविणारी आहे. जे मतदान आपल्या गावच्या लोकसभेतून होणार आहे ते पंतप्रधानांना होणार आहे. मोदी पंतप्रधान होणार असतील आणि खासदार त्यांना मतदान करणार असतील त्यावेळी छत्रपतींच्या भूमितील खासदार हा मोदींना मतदान करणारा असावा ते करण्याचे काम तुम्हाला करायचे आहे, असे आवाहनही दरेकर यांनी केले. तसेच यावेळी दरेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारने केलेल्या विकास कामांची, योजनांची माहितीही उपस्थित जनसमुदायाला दिली.
उद्धव ठाकरेंवर तोफ डागताना दरेकर म्हणाले की, उद्धव ठाकरेंकडे बोलायला काही नाही. मोदींच्या कारकिर्दीवर टीका करायला मुद्दे नाहीत, मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केवळ गद्दार आहेत अशी टीका करायची परंतु शिंदे यांच्या कामाबाबत एकही टीका उद्धव ठाकरे करु शकत नाहीत. कारण त्यांना अडीच वर्षाच्या काळात जे जमले नाही ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार मुंबईसह महाराष्ट्रासाठी काम करताना दिसत आहे. अडीच वर्षाच्या काळात उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना केंद्रातून एक दमडीही त्यांनी आणली नाही. केंद्राच्या योजना थांबविण्याचे पाप उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली झाल्याचा आरोपही दरेकरांनी यावेळी केला.
त्याचबरोबर या निवडणुका जिंकणे ही कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. गावाला, तालुक्याला विकसित करण्याचे काम मुंबईच्या चाकरमान्यांनी केले आहे. उमेदवार हा महायुतीचा आहे, पंतप्रधान मोदींसाठी मतदान करणारा, देशाचे भविष्य घडविणारा उमेदवार आहे. या भावनेतून सर्वांनी ताकदीने काम केले पाहिजे, गावागावात जाऊन प्रचार केला पाहिजे. आपल्या विकासाची दारे उघडली आहेत. महायुतीच्या माध्यमातून राज्य सरकार काम करतेय. केंद्राचे पाठबळ पाहिजे तर छत्रपतींच्या आणि बाबासाहेबांच्या भूमीतून प्रचंड ताकदीने आपला खासदार गेला पाहिजे. भाजपाचे कार्यकर्तेही ताकदीने काम करणार आहेत. पंतप्रधान मोदींचे देशाला नेतृत्व हवेय त्यावेळेला भाजपाचा कार्यकर्ता कुठेही मागे राहणार नाही, असा विश्वासही दरेकरांनी व्यक्त केली.