मुंबई – राज्यातील विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर अशा 5 मतदारसंघाच्या निवडणुका पार पडल्या आहेत, यात भाजपला दोन विद्यमान आमदार गमवावे लागले. यात अमरावती पदवीधरमधून रणजित पाटील यांचा, तर भाजप पुरस्कृत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार यांचा पराभव झाला. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री नागपूरचे असताना तिथे झालेल्या पराभवामुळे भाजपचे टेन्शन वाढले आहे.
औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात विक्रम काळे
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात विक्रम काळे निवडून आले आहेत. तर अमरावती पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांनी विजय मिळवला आहे. तर नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे हे विजयी झाले आहेत. कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शेकापचे बाळाराम पाटील यांचा पराभव केला. तर महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले यांनी भाजप पुरस्कृत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार यांचा पराभव केला आहे. मराठवाडा शिक्षक मतदारसंघात सुरूवातील राष्ट्रवादी काँग्रसचे विक्रम काळे आणि भाजपचे किरण पाटील यांच्यात प्रमुख लढत असेल असे चित्र दिसून आले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराजीतून वक्ता सेलचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप सोळुुंके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, जयदत्त क्षीरसागर यांना किरण पाटील यांना पाठिंबा दिल्याने चित्र पालटणार की काय अशी चर्चा सुरू होती. मात्र अचानक सुर्यकांत विश्वासराव यांनी 13 हजारांहून अधिक मते घेतल्याने निवडणुकीची रंगत वाढली होती. मात्र यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे यांनी विजय मिळवला आहे. यात मविआच्या विक्रम काळे यांना दुसऱ्या पसंतीत 23,577 मते मिळाली तर भाजपच्या किरण पाटील यांचा 6,934 मतांनी पराभव झाला आहे.
ज्ञानेश्वर म्हात्रे यांना 20,683 मते
कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शेकापचे बाळाराम पाटील यांचा पराभव केला आहे. सर्वात प्रथम कोकण शिक्षक मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला होता. यात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांना 20,683 मते मिळाली असून त्यांनी मविआच्या बाळाराम पाटील यांना 9,686 मतांनी पराभूत केले आहे.
डॉ रणजित पाटील यांचा मविआच्या धीरज लिंगाडे यांनी पराभव केला
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे दोन टर्म पासून अमरावती पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे डॉ रणजित पाटील यांचा मविआच्या धीरज लिंगाडे यांनी पराभव केला आहे. धीरज लिंगाडे बुलढाणा जिल्हाचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते तर अमरावती पदवीधर मतदारसंघ काँग्रेस पक्षाला सुटल्याने काँग्रेस पक्षाने धीरज लिंगाडे यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश घेऊन त्यांना उमेदवारी दिली. धीरज लिंगाडे 3 हजार 368 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी एकूण 46 हजार 344 मते मिळवली आहेत. रणजित पाटील यांचा पराभव हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
भाजपचे टेन्शन वाढले
भाजपचे केंद्रीय मंत्री, प्रदेशाध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर मतदारसंघात भाजप पुरस्कृत ना.गो. गाणार यांचा पराभव झाल्याने भाजपचे टेन्शन वाढले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले यांना 16,700 मते पडली असून त्यांनी 8,489 मतांनी गाणार यांना पराभूत केले आहे.
नाशिकमध्ये अपक्ष तांबे विजयी
5 विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक चर्चा असलेली निवडणूक होती, ती म्हणजे नाशिक पदवीधर मतदारसंघाची काँग्रेस उमेदवार सुधीर तांबेंनी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल न करता त्यांचा मुलगा सत्यजित तांबेंनी अपक्ष निवडणूक लढवली, भाजपच्या सर्व नेत्यांनी त्यांना मदत केल्याचे जाहीरदेखील केले, यावेळी त्यांच्या विरोधात मविआच्या शुभांगी पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या निवडणुकीत अपक्ष सत्यजित तांबे यांना 68,999 मते मिळाली तर मविआच्या शुभांगी पाटील यांचा 29,465 मतांनी पराभव केला आहे.
अशी आहे मतांची आकडेवारी
शिक्षक : मराठवाडा विक्रम काळे, मविआ दुसऱ्या पसंतीत विजयी 23,577 मते, किरण पाटील (भाजप) 6,934 मतांनी पराभूत
शिक्षक : नागपूर सुधाकर अडबालेविजयी (मविआ) 16,700 मते, ना.गो. गाणार (भाजप) 8,489 मतांनी पराभूत
शिक्षक : कोकण ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी (भाजप) 20,683 मते, बाळाराम पाटील (मविआ) 9,686 मतांनी पराभूत
पदवीधर : नाशिक सत्यजित तांबे विजयी (अपक्ष) 68,999 मते, शुभांगी पाटील (मविआ) 29,465 मतांनी पराभूत
पदवीधर : अमरावती धीरज लिंगाडे यांचा 3 हजार 368 मतांनी (भाजप ) डॉ. रणजित पाटील यांचा पराभव केला