माढा : प्रसंगी तुरूंगवास पत्करेन पण सत्ताधाऱ्यांच्या दबावाला भीक घालणार नाही असा पलटवार माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. माळशिरसमध्ये झालेल्या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटलांवर सडकून टीका केली होती. याच टीकेला मोहिते पाटलांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माढा मतदारसंघातील माळशिरस येथील सभेत थेट मोहिते पाटील यांच्यावर निशाणा साधताना आता गुंडगिरी , झुंडशाही , भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा दिला होता. तुमच्या टीकेला कृतीतून उत्तर दिले जाईल असेही फडणवीस यांनी अकलूजच्या विजय चौकात सांगितले होते. यानंतर मोहिते पाटील काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष असताना धैर्यशील मोहिते पाटील यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना प्रतिआव्हान देत मी कोणत्या दबावाला भीक घालणार नाही असे म्हटले आहे.
धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, मी शंकरराव मोहिते पाटलांचा नातू आहे. त्यामुळे असल्या कोणत्याही गोष्टीला भीक घालत नाही. हे केवळ तुमच्यासाठी भीक घालणार नाही. ठरवतानाच मी कुटुंबात माझ्या वडिलांना, आईला आणि पत्नीला, दोन मुलींना सांगितलं होते को इलेक्शन झाल्यानंतर मला अनेक गोष्टींना तोंड द्यायची वेळ येणार आहे. माझी काहीही तयारी आहे ती फक्त मोहिते पाटील कुटुंबावर प्रेम करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी, सर्व सामान्यांसाठी मी काय पण किंमत मोजेल, आत बसण्याची तयारी देखील ठेवली आहे, मानसिकता केली आहे. असं पाटील म्हणाले.