मोहोळ गावामध्ये नागनाथ महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी झाली (फोटो - टीम नवराष्ट्र)
Satara News : मोहोळ : दादासाहेब गायकवाड : प्रचंड उष्णता आणि घामाच्या धारांची पर्वा न करता, ‘ना चिंता ना भय, नागनाथ महाराज की जय’च्या जयघोषात मोहोळचे ग्रामदैवत श्री नागनाथ महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी झाली. गुरुवारी पार पडलेल्या या सोहळ्यात हजारो भाविकांनी आपल्या लाडक्या दैवताच्या दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती.
यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या श्रींच्या पालखीची आणि गणांची सवाद्य मिरवणूक पारंपरिक थाटात निघाली. डोक्यावर तळपणारा सूर्य असतानाही भाविकांच्या उत्साहात कोणतीही कमतरता भासली नाही. या मिरवणुकीत साकी आणि अभंगांच्या स्वरांनी चैतन्य भरले होते, तर ‘शेख नसरुद्दीन बादशहा की दो चिराऊ दिन…’ या जयघोषाने सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडवले.
गुरू-शिष्यांचे मिलन आणि खर्ग तीर्थावरील गर्दी
या सोहळ्याचा सर्वात भावूक क्षण म्हणजे राजेंद्र खर्गे महाराज आणि अरुण काका मोहोळकर यांची ‘गुरू-शिष्य भेट’. खर्ग तीर्थावर संपन्न झालेल्या या भेटीचे साक्षीदार होण्यासाठी शेकडो भाविक उपस्थित होते. मिरवणूक मंदिरात परतल्यानंतर महाआरती झाली आणि भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही खर्गे महाराजांनी पावसाची भाकणूक केली. त्यांच्या वर्तवलेल्या अंदाजानुसार
पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा : शाहूपुरीतील पाणीपुरवठा पिवळसर! दूषित पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात? जाणून घ्या उपाययोजना
पाऊस कमी असला तरी खरीप आणि रब्बी हंगामातील पेरण्या मोठ्या प्रमाणात होतील.
भविष्यात चारा टंचाईमुळे चाऱ्याचे दर वाढण्याची आणि काही काळ रोगराई पसरण्याची शक्यता आहे.
यात्रेनिमित्त मोहोळमध्ये आनंदाचे वातावरण होते. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांसाठी मनोरंजनाचे साधन म्हणून मोठे पाळणे, खेळण्यांची दुकाने आणि मिठाईचे स्टॉल्स लावण्यात आले होते. उन्हाचा तडाखा लक्षात घेता, शहरातील विविध सामाजिक संस्था, यांच्या वतीने ठिकठिकाणी थंड पाणी, सरबत आणि नाष्ट्याची सोय करण्यात आली होती.
हे देखील वाचा : NCERT चा अजब कारभार! मराठा साम्राज्याचा नकाशा वगळल्याने इतिहासप्रेमी आक्रमक
श्री नागनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त मोहोळ शहरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती, या पार्श्वभूमीवर मोहोळ पोलिसांनी अत्यंत चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. यात्रेदरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मंदिर परिसरावर पोलिस लक्ष ठेवून होते. साध्या वेशातील पोलिसांची गस्तही वाढवण्यात आली होती. पोलिसांच्या या सतर्कतेमुळे आणि सुनियोजित नियोजनामुळे आता पर्यंतचा संपूर्ण यात्रा सोहळा अत्यंत शांततेत पार पडला. पोलिस प्रशासनाच्या या कामगिरीचे भाविक आणि स्थानिक नागरिकांकडून कौतुक होत आहे. देवस्थान कमिटी आणि नागेश भक्तांच्या नियोजनामुळे हा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.






