More than 3 lakh devotees are making the journey every day Via Metro
पुणे : पुणे शहरात मध्यवर्ती भागात कसबा, मंडई आणि स्वारगेट येथे मेट्रो सुरू झाल्याने मोठ्या संख्येने भाविक हे मेट्रोचा प्रवास करत आहेत. दररोज सुमारे दोन लाख मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत गणेशोत्सवात वाढ झाली असून, गणेशोत्सवात तब्बल तीन लाखांहून अधिक प्रवासी हे मेट्रोने प्रवास करत आहे, अशी माहिती मेट्रोचे अतिरिक्त महासंचालक चंद्रशेखर तांभवेकर यांनी दिली.
पुणे शहरातील गणेशोत्सव हे जगप्रसिद्ध असून जगभरातून भाविक हे दर्शनासाठी पुण्यात येत असतात. यंदा महामेट्रोच्या वतीने सर्व मार्गावर मेट्रो सुरू झाल्याने गणेशोत्सवात येणारे भाविक मोठ्या संख्येने मेट्रो सेवेचा लाभ घेत आहे. याबाबत मेट्रोचे अतिरिक्त महासंचालक चंद्रशेखर तांभवेकर म्हणाले की, मेट्रो प्रशासनाच्या वतीने गणेशोत्सवासाठी नियोजन करण्यात आलं असून, दिवसभरात ५५४ फेऱ्या मेट्रोच्या दोन्ही मार्गावर होत होत्या. पण गणेशोत्सवात गणेश भक्तांची वाढती संख्या पाहता मेट्रो दिवसभरात ७४० फेऱ्या पूर्ण करत आहे. मोठ्या प्रमाणात नागरिक मेट्रो सेवेचा लाभ घेत आहे’.
तसेच, गणेशोत्सवाच्या आधी दररोज सव्वा दोन लाख मेट्रोने प्रवास करत होते. आत्ता ती संख्या वाढली असून, आत्ता गणेशोत्सवात दररोज तब्बल तीन ते सव्वा तीन लाख प्रवासी प्रवास करत आहे. यात मंडई स्थानक हे सर्वात गर्दीच स्टेशन असून, इथं मोठ्या संख्येने भाविक प्रवास करत आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी सकाळी ६ वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी रात्री ११ पर्यंत तब्बल ४१ तास मेट्रो सुरू असणार असून, भाविकांनी मेट्रो सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी त्यांच्याकडून करण्यात आलं आहे.
जून महिन्यातही प्रवासी संख्येत झाली वाढ
पुणे मेट्रोच्या दोन्ही मार्गांवर सेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जून महिन्यात एकट्या महिन्यात तब्बल ५२ लाख ५७ हजार प्रवाशांनी मेट्रोचा वापर केला आहे. ही आतापर्यंतची सर्वाधिक मासिक प्रवासी संख्या असून, मेट्रोने एका महिन्यातच ५० लाख प्रवाशांचा टप्पा ओलांडला आहे.
दोन महत्त्वाच्या मार्गांना केंद्राची मंजूरी
पुणे मेट्रोच्या दोन महत्वाच्या विस्तारीत मार्गांना केंद्र सरकारकडून अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज बुधवारी झालेल्या बैठकीत वनाझ ते चांदणी चौक आणि रामवाडी ते विठ्ठलवाडी (वाघोली) या मेट्रो मार्गांना हिरवा कंदील दाखवला आहे. एकूण सुमारे ३,७५६.५८ कोटी रूपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे पुणे मेट्रोचा शहराच्या दोन दिशांना विस्तार होणार आहे.