वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील पवना धरणग्रस्तांचे पुनर्वसन करावे, बाधित प्रकल्पग्रस्तांना प्रत्येकी चार एकर जमीन, प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्यात यावी आदी मागण्यांसाठी पवना धरणग्रस्तांच्या वतीने मंगळवारी सकाळी तीव्र आंदोलन करण्यात आले.
या वेळी संतप्त आंदोलकांनी मोर्चा काढून पवना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना बाहेर काढून कार्यालयाला टाळे ठोकले.त्यामुळे धरणातून पिंपरी चिंचवड शहरासाठी सोडण्यात येणारा पाणीपुरवठा बंद झाला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठक घेऊन तोडगा काढण्यासाचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.
मावळ तालुक्यातील पश्चिम भागात पवना धरणाचे काम १९७३मध्ये पूर्ण झाल्यावर खोऱ्यातील २० ते २५ गावे विस्थापित झाली. मात्र, ५० वर्षांत
विविध राजकीय पक्षांची सरकार येऊनही धरण प्रकल्पग्रस्त न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.
या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मावळचे आमदार सुनील शेळके, भाजपाचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, किसान संघाचे अध्यक्ष शंकरराव शेलार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ, माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, गणेश धनिवले, लक्ष्मण भालेराव,धरणणग्रस्त संयुक्तसंघटनेचे अध्यक्ष नारायण बोडके, यांच्यासह मोठ्या संख्येने आंदोलनकर्त्या सहभागी झाले होते.
मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख, यांच्यासह पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील, उपअभियंता अशोक शेटे, पवना धरण अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुजित कुमार राजगिरे, यांना विविध मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले.
लोणावळा ग्रामीण पोलिसांचा चोख बंदोबस्त
पवना बंदिस्त जलवाहिनीच्या विरोधात मावळ तालुक्यात १२ वर्षांपूर्वी पुणे मुंबई महामार्गावर आंदोलन झाले या आंदोलनात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन शेतकरी मृत्युमुखी पडले. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पवना धरण परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.