नारायण राणे यांची राहुल गांधी यांच्यावर टीका (फोटो- ट्विटर)
परभणीतील रेल्वे स्थानकाबाहेर 10 डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या काचेच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली होती, त्यानंतर हिंसाचाराच्या बातम्या आल्या होत्या. स्मारक पाडण्याच्या विरोधात झालेल्या हिंसाचारानंतर आंबेडकरवादी सोमनाथ सुर्यवंशी आणि विजय वाकोडे यांचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या 12 दिवसानंतर राहुल गांधी आज (23 डिसेंबर) सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांची ते भेट घेतली. त्यांनी 20 ते 25 मिनिटे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांशी चर्चा केली. पम यावेळी त्यांनी पोलिसांवर आणि प्रशासनावरच गंभीर आरोप केले आहेत. आता खासदार नारायण राणे यांनी राहुल गांधी यांना एक जोरदार टोला लगावला आहे.
आज लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि खासदार राहुल गांधी हे परभणी दौऱ्यावर होते. यावेळेस त्यांनी निळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला होता. त्यावरून खासदार नारायण राणे यांनी राहुल गांधी याच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांना महाराष्ट्र समजलेला, कळलेला नाही अशी टीका खासदार नारायण राणे यांनी त्यांच्यावर केली आहे.
राहुल गांधी यांना महाराष्ट्र समजलेला नाहीये. राहुल गांधी यांना परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तरी समजले आहेत का? कपड्याचा रंग निळा असला म्हणजे आंबेडकरवादी होत नाही. त्यासाठी कपड्यांच्या आतमध्ये देखील काहीतरी असावे लागते, असा सणसणीत टोला नारायण राणे यांनी राहुल गांधी यांना लगावला आहे. तसेच नारायण राणे यांनी छगन भुजबळ-मुख्यमंत्री फडणवीस भेटीवर देखील भाष्य केले आहे. भुजबळ आम्हाला सीनियर होते. दिल्लीतील हवा चांगली आहे त्यामुळे कदाचित त्यांना दिल्लीत बोलावले असेल.
हेही वाचा: Rahul Gandhi On Parbhani Violence: सोमनाथ सुर्यवंशींचा मृत्यू नव्हे हत्या….; राहुल गांधींचा आरोप
सोपान दत्तराव पवार नावाच्या व्यक्तीने 10 डिसेंबर रोजी परभणी रेल्वे स्थानकासमोरील आंबेडकर स्मारकाच्या काचा फोडून संविधानाच्या प्रतिकृतीचे नुकसान केले होते. यानंतर लोकांनी पवार यांना पकडून बेदम मारहाण केली. त्यानंतर तरुणाला पोलिसांनी अटक केली. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 11 डिसेंबर रोजी परभणी बंदची हाक देण्यात आली होती. यावेळी लोकांनी आरोपींना लवकरात लवकर फाशी देण्याची मागणी केली होती. या बंदीच्या काळात हिंसाचार उसळला. यावेळी जमावाने तोडफोड आणि जाळपोळ केली. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या आणि लाठीचार्ज केला.
सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या ही सरकार पुरस्कृत आहे.
ते दलित होते आणि संविधानाचे रक्षण करत होते.
मनुस्मृती मानणाऱ्या लोकांनी त्यांचा जीव घेतला आहे. pic.twitter.com/2sfNX1OOmb
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 23, 2024
त्याच रात्री पोलिसांनी हिंसाचार प्रकरणी 50 जणांना अटक केली होती. यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचाही समावेश होता. दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवल्यानंतर आरोपीची कारागृहात रवानगी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी सांगितले की, छातीत दुखत असल्याच्या तक्रारीवरून सोमनाथला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे 15 डिसेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला.