सौजन्य - नवराष्ट्र टीम
पोपट पिटेकर/अहिल्यानगर : शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत राज्यात सध्या मोठ्या प्रमाणावर शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जात आहे. मात्र, या भरतीमध्ये कला शिक्षकांच्या अत्यंत तुटपुंज्या जागा काढण्यात आल्याने राज्यभरातील कला शिक्षक अभियोग्यता धारकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय आणि पावसाळी अधिवेशनात शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी कला शिक्षकांची भरती करण्याचे वारंवार आश्वासन दिले होते. परंतु प्रत्यक्ष भरतीत कला विषयाला डावलल्याने शासनाच्या धोरणावर चहुबाजूने टीका होत आहे.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांवर गदा; खासदार निलेश लंकेंचा सरकारवर घणाघात
या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी राज्य सरकारवर कडक शब्दांत टीका केली आहे. “राज्यातील अनेक शाळांमध्ये कला शिक्षकच नाहीत, तर काही ठिकाणी पूर्ण शाळेसाठी अवघा एकच शिक्षक कार्यरत आहे. विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देणे आणि त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे हे शासन व प्रशासनाचे कर्तव्य आहे. मात्र, सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलत आहे. या परिस्थितीला सर्वस्वी राज्य सरकारच जबाबदार आहे,” असा थेट आरोप निलेश लंके यांनी केला.
मराठी शाळा बंद पडण्यास कला-क्रीडा शिक्षकांची कमतरता कारणीभूत : हेरंब कुलकर्णी
प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनीही या निर्णयावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. शिक्षण व्यवस्थेतील दरी स्पष्ट करताना ते म्हणाले, “एकीकडे सरकारी आणि मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये कला व क्रीडा शिक्षकांची भरती केली जात नाही. दुसरीकडे, खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळा या कला आणि क्रीडा विषयांना विशेष प्राधान्य देतात व त्यासाठी आवश्यक भौतिक सुविधाही उपलब्ध करून देतात. पालकांचा ओढा इंग्रजी शाळांकडे वाढण्याचे आणि मराठी शाळा पटसंख्येअभावी बंद पडण्याचे हे एक प्रमुख कारण आहे.” शिक्षणातील हा भेदभाव थांबवण्यासाठी सर्व शैक्षणिक संस्थांवर कला शिक्षकांची भरती करणे बंधनकारक करायला हवे, अशी मागणी त्यांनी केली.
८० टक्के भरतीच्या नियमामुळे संस्थाचालकांची उदासीनता
सध्या लागू असलेल्या ८० टक्के शिक्षक भरतीच्या नियमाचा फटका कला विषयाला बसत असल्याचे चित्र आहे. या नियमाचा आधार घेत बहुतांश शिक्षण संस्था मुख्य विषयांचे शिक्षक भरण्याला प्राधान्य देतात आणि कला शिक्षकांच्या जागा भरण्याबाबत उदासीनता दाखवतात. परिणामी, कला आणि क्रीडा विषयांच्या गुणवत्तेपासून तसेच योग्य मार्गदर्शनापासून हजारो विद्यार्थी वंचित राहत आहेत. शासनाने आपल्या आश्वासनाची पूर्तता करत कला शिक्षकांच्या जागांमध्ये तात्काळ वाढ करावी, अन्यथा याविरोधात राज्यभरात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा अभियोग्यता धारकांनी दिला आहे.






