महाराष्ट्राविरोधात वक्तव्य करणारे भाजप खासदार निशिकांत दुबे यांची मुंबईतील खारमध्ये कोट्यवधींची प्रॉपर्टी आहे (फोटो - सोशल मीडिया)
Nishikant Dubey Mumbai property : मुंबई : राज्यामध्ये हिंदी विरुद्ध मराठी असा वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातील प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्यावरुन हा वाद सुरु झाला होता. यासाठी मनसे नेते राज ठाकरे यांनी कडाडून विरोध केला. तसेच उद्धव ठाकरे यांनी देखील याच पद्धतीचा विरोध केला. मात्र यामध्ये भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी आगीत तेल ओतण्याचे काम केले. निशिकांत दुबे यांनी मराठी माणसांची अस्मिता दुखावेल अशा स्वरुपाची वक्तव्य करुन वाद आणख वाढवला. महाराष्ट्र आणि मुंबईचा अपमान करणाऱ्या निशिकांत दुबे यांची मुंबईमध्ये कोट्यवधींची मालमत्ता असल्याचे दिसून आले आहे.
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मुंबई, मराठी आणि नेत्यांविरोधात गरळ ओकली. महाराष्ट्राचा जीडीपी काढत थेट आव्हान दिले. यानंतर आता निशिकांत दुबे यांचे महाराष्ट्र कनेक्शन आणि प्रॉपर्टीचे आकडे समोर आले आहेत. मुंबईकरांची अस्मिता दुखावणारे निशिकांत दुबे हे मुंबईमध्ये तब्बल 16 वर्षे राहत होते. महाराष्ट्रातील लोकांच्या भाकरीचा हिशोब काढताना निशिकांत दुबे यांना त्यांच्या मुंबईतील कोट्यवधी रुपयांच्या घराचा विसर पडला होता. मुंबईतल्या खार झुलेलाल अपार्टमेंटमध्ये ते वास्तव्यास होते. त्यांचा पत्ता हा निशिकांत दुबे, 404, झुलेलाल अपार्टमेंट, मार्ग क्रमांक १६, खार पश्चिम असा होता. मुंबईतल्या खार या भागात असलेल्या या फ्लॅटची किमत कोट्यवधींच्या घरात आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
निशिकांत दुबेंनी २००९ मध्ये निवडणूक लढवली होती. त्यावेळी या फ्लॅटचा उल्लेख आपल्या मालमत्तेच्या यादीत केला आहे. १९९३ ते २००० या कालावधीत निशिकांत दुबे मुंबईत नोकरी करत होते. संचालक पद मिळवण्यापर्यंत त्यांनी प्रगती केली होती. आयुष्याची इतके वर्षे मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये काढलेल्या या नेत्याने मात्र महाराष्ट्राबाबत वादग्रस्त विधान केले. यावरुन राज्यामध्ये जोरदार टीका देखील करण्यात आली.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाले होते निशिकांत दुबे?
निशिकांत दुबे म्हणाले होते की, “महाराष्ट्रामध्ये हे काय सांगतात की मराठी बोलले पाहिजे. हे कोणाची भाकर खात आहेत. टाटा, बिर्ला, रिलायन्स आहे हे कोणीही महाराष्ट्रीयन नाहीत. महाराष्ट्रात कोणी सर्वात जास्त टॅक्स भरत का? आमच्या पैशांवर तुम्ही जगत आहात. कोणती इंडस्ट्री तुमच्याकडे आहे? खाणी तरी आहेत का तुमच्याकडे? हे सगळं झारखंड, उडीसा आणि बिहारमध्ये आहे. सगळे प्रकल्प गुजरातमध्ये जात आहेत. तुम्ही फक्त लाठीशाही करत आहात. तुम्ही आमचेच शोषण करत आहात. तुमच्यामध्ये एवढी हिम्मत आहे तर उर्दु भाषिकांना सुद्धा मारा. तमिळ, तेलुगू भाषिकांना तुम्ही मारुन दाखवा. तुम्ही हे भंगार वागणूक करत आहात. तुम्हाला मी आधी पण सांगितलं आहे की, तुम्ही महाराष्ट्रात बसून मोठे बॉस आहात तर चला बिहारला चला. उत्तरप्रदेश आणि तमिळनाडूमध्ये चला. तिथे तुम्हाला आपटून आपटून मारु. हा तोरा चालणार नाही,” अशा शब्दांत गरळ ओकून खासदार निशिकांत दुबे यांनी वादग्रस्त विधान केले होते.