मनसेच्या २० व्या स्थापना दिनानिमित्त मनसे राज ठाकरे यांची सोशल मीडिया पोस्ट केली (फोटो - सोशल मीडिया)
मनसे नेते राज ठाकरे यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, “सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापनदिनाच्या तुम्हा सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा. आज पक्षाच्या स्थापनेला २० वर्ष झाली. २० वर्ष हा तसा दीर्घ टप्पा असतो, मग तो व्यक्तीच्या किंवा संघटनेच्या आयुष्यातील,” असे लिहिले आहे.
हे देखील वाचा : संसदीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून सुरु; जागतिक युद्धावरुन मोदी सरकारला पकडणार कोंडीत?
पुढे त्यांनी लिहिले आहे की, “२० वर्षांपूर्वी महाराष्ट्राचा विकास, महाराष्ट्राची अस्मिता, मराठी भाषा आणि मराठी माणूस याच्या हितासाठी झटणारी एक संघटना ही कल्पना घेऊन या पक्षाची स्थापना झाली. त्यामुळे आज फक्त पक्षाला नाही तर या कल्पनेला वीस वर्ष झाली. ही कल्पना आज दृढ झाली आहे , पण २० वर्षांपूर्वी मराठी माणूस, भाषा, अस्मिता या सर्व गोष्टींचा सर्वांना विसर पडला होता तो जागृत करण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलं हे सर्वांना मान्यच करायला हवं! मधल्या काळात आपण अनेक आंदोलनं केली, मोर्चे काढले, निवडणुका लढवल्या कधी यश मिळालं कधी नाही मिळालं पण या सगळ्या प्रवासात मराठी म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे लोकांच्या मनात बिंबलं. आज कुठेही मराठी माणसावर अन्याय झाला तर कुठे आहे मनसे असं इतर राजकीय पक्षांचे समर्थक पण विचारतात यातच आपण काय कमावलं आहे याचा अंदाज येईल.”
सस्नेह जय महाराष्ट्र, सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापनदिनाच्या तुम्हा सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा. आज पक्षाच्या स्थापनेला २० वर्ष झाली. २० वर्ष हा तसा दीर्घ टप्पा असतो, मग तो व्यक्तीच्या किंवा संघटनेच्या आयुष्यातील. २० वर्षांपूर्वी महाराष्ट्राचा विकास,… pic.twitter.com/OkDsW3fQcd — Raj Thackeray (@RajThackeray) March 9, 2026
“गेल्या २० वर्षांत प्रचंड बदल झाले आहेत. महाराष्ट्रात पूर्ण एक नवीन पिढी आता मतदार झाली आहे. पक्ष स्थापनेच्या वेळेस आपल्याच सहकाऱ्यांची त्यांच्या कडेवर असणारी मुलं आता मतदार झाली आहेत, उत्तम काम करत आहेत. ही मुलं तरी आपलीच आहेत, पण महाराष्ट्रात आज जगाला गवसणी घालण्याचं स्वप्न आणि जिद्द बाळगणारी मुलं प्रत्येक तालुक्यात आहेत. जग चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या उंबरठ्यावर आहे आणि ती क्रांती महाराष्ट्रात घडावी आणि इतकंच नाही तर हे सगळं आपल्या भाषेत घडावं अशी आमची इच्छा आहे. त्यांना उत्तम आयुष्य म्हणजे काय असावं हे माहित असावं आणि त्यासाठी कष्ट करण्याची त्यांची तयारी देखील असावी तर आणि तरच महाराष्ट्राचा हेवा वाटावा असा भूतकाळ पुन्हा वर्तमानात आणि भविष्यात यावा हीच आमची इच्छा आणि अपेक्षा !”
हे देखील वाचा : वर्धापनदिनी मनसे पक्ष रायगडावरुन फुंकणार रणशिंग; राज ठाकरेंची सोशल मीडिया पोस्टमधून खास रणनीती
“अशा सर्व होतकरू मराठी तरुण-तरुणींना आज तुम्हाला महाराष्ट्राचे पाईक होण्याची संधी आहे. उद्या १० मार्च २०२६ पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सदस्य नोंदणी सुरु होत आहे. त्यात तुम्ही सहभागी व्हा. तुमची राजकीय विचारधारा, तुमची जात, तुमचा धर्म यापेक्षा तुम्ही आमच्यासारखेच महाराष्ट्र वेडाने झपाटलेले आहात हेच जगाला दिसावं हेच आमच्यासाठी पुरेसं आहे. आणि तुम्ही सदस्य झालात म्हणजे नुसते महाराष्ट्र सैनिकच नाही तर महाराष्ट्राचे पाईक होणार आहात हे लक्षात घ्या. एक नवा महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे, तुम्ही पक्षाचे सक्रिय सभासद पण होऊ शकता ! या फॅार्म मधे शेवटी हा पर्याय पण दिलेला आहे त्यावर होकार कळवावा , माझे सहकारी आपल्याशी संपर्क साधतील !”
त्यासाठी ही सदस्य नोंदणीची संधी सोडू नका. माझे सर्व सहकारी आपल्या भागात प्रत्यक्ष असतीलच परंतू तिथे शक्य नसेल तर त्यासाठीच्या संकेतस्थळाची लिंक उद्या सुरु होत आहे. तेंव्हा याचा लाभ घेत जरूर सदस्य व्हा, असे आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी वर्धापन दिनी केले आहे.






