NMMC Election 2026: टांगा कोणाचा पलटी होणार? कोणाच्या बाजूने लागणार निकाल? नवी मुंबईत वाढली उत्सुकता
सिद्धेश प्रधान
अखेर हो नाही म्हणता म्हणता नवी मुंबई पालिकेची निवडणूक संपन्न झाली असून मुख्य लढत भाजपा व शिवसेनेच राहणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नवी मुबाईकरांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नवी मुंबईत यंदा शिवसेना ही नाईकांच्या सत्तेच्या म्हणजेच भाजपाच्या तोडीस तोड पोहोचलेली दिसून आली. हा कदाचित शिवसेनेसाठी मानसिकदृष्ट्या विजय म्हणावा लागले असे तज्ञांचे म्हणणे आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
त्यामुळे सत्ता वाचवण्यासाठी गणेश नाईक यांना प्रयत्न करावे लागले आहेत. यासाठी गणेश नाईक यांनी २८ पैकी अनेक भागात सहभाग घेत, रॅली काढत माहोल तयार करण्याचा प्रयत्न केला. उपमुख्यमंत्री यांच्यापुढे राज्याचा पसारा असूनही त्यांनी नवी मुंबईला वेळ देत ऐरोली ते तुर्भे तसेच बेलापुर ते वाशी अशी दिवसभर रॅली काढत कार्यकर्त्यांच्या कार्यालयात जात शिवसेनेसाठी वातावरण निर्मिती केली होती. राज्याचा एक उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री नवी मुंबईतील अनेक गावांमध्ये जाऊन भेट देतो. नागरिकांशी संवाद साधतो ही बाब शिवसैनिकांसह, सामान्य नागरिकांसाठी देखील स्वप्नवत होती. या दोन्ही नेत्यांकडून पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वातावरण निर्मिती करण्यास संपूर्ण ताकद पणाला लावलेली दिसून आले. गणेश नाईक यांच्यासोबत माजी खा. संजीव नाईक तसेच त्यांच्या पत्नी कल्पना नाईक, माजी आ. संदिप नाईक, माजी महापौर सागर नाईक अशी नेत्यांची फौज नवी मुंबईत प्रचाराला फिरताना दिसली.
कागदावरील आकडेवारी पाहता शिवसेना ऐरोली मतदार संघात भक्कम आहे. तर भाजपा बेलापुरात बळकट आहे. गणेश नाईकांचे कट्टर राजकीय वैरी व शिवसेनेचे उपनेते विजय चौगुले यांची सद्दी तोडण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मुख्यमंत्र्यांची सभा न लावता ती ऐरोलीच्या एका कोपऱ्यात लावून एकप्रकारे शिवसेनेच्या बळकट असण्यावर नाईकांनी संमती दिल्याचे कृतीतून दिसून आले. त्यामुळे देखील भाजपा कार्यकर्त्यांकडूनच आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.






