नवी मुंबई विमानतळ जमीन वाद चिघळला (Photo Credit- X)
नवी मुंबई/सिद्धेश प्रधान: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील बिवलकरांच्या जमिनीचा वाद आणखीन चिघळला आहे. रोहित पवारांनी ही जमीन सिडकोने नियमबाह्य पद्धतीने बिवलकर कुटुंबियांना दिल्याचे सांगत आरोप केले होते. देश सोडण्यापूर्वी बिवलकरांना अटक करा अशी मागणी पवारांनी केली. यावर बिवलकर यांनी रोहित पवारांना आव्हान दिले आहे. मी रणछोडदास नसून,आमची हक्काची जमीन आहे. मी चोरी केलेली नाही असे बिवलकर म्हणाले. ते मंगळवारी वाशीत पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी बिवलकर यांची बाजू मांडणारे त्यांचे वकील तन्वीर निझाम उपस्थित होते. ते म्हणाले की, या प्रकरणी आम्ही देखील एसआयटीची मागणी करत आहोत. बिवलकराना त्रास देणाऱ्यांत जमिनी हडपणारा समूह सामील आहे. उर्मिष उधाणी म्होरक्या असून, के. कुमार, भावना घाणेकर तसेच एक पत्रकार सामील आहे. सिडकोमधून विकासकांना दिलेल्या भूखंडांची माहिती काँशियस फोरम संस्थेचे के. कुमार हा माहिती अधिकारात मिळवतात. ती माहिती उधाणींना दिली जाते.त्या जमिनीत लेटिगेशन तयार करून विकासकांना त्रास दिला जातो. के कुमार संस्थेच्या नावावर विकासकांविरोधात वनविभागाला तक्रारी करतात. वन विभागाकडून कारवाई होते. सध्या बिवलकर प्रकरणी अशीच पद्धत वापरल्याचे ऍड.निझाम यांनी सांगितले.
रोहित पवार हे सातत्याने माझी व कुटुंबियांची बदनामी करत आहेत. माझ्या नावावर एक एनसी देखील नाही. आम्हाला जमीन राघोजी आंग्रे यांच्याकडून इनाम स्वरूपात मिळाली होती. ती ब्रिटिशांनी ताब्यात घेतल्यावर. आम्ही लंडनच्या सुप्रीम कोर्टात लढून ती परत मिळवली
आमचा खोटा इतिहास सांगितला गेला.याबाबत रोहित पवार, उर्मिष उधाणी, भावना घाणेकर तसेच संबंधितांवर १ हजार कोटींचा दावा ठोकणार असल्याचे बिवलकर म्हणाले.
मी जयंत टिळकांसोबत शरद पवारांना भेटलो आहे. मात्र कामासाठी मी कधी गेलेलो नाही. पवारांना बिवलकरांचा इतिहास चांगलाच माहित आहे.रोहित पवारांनी आरोप करताना निदान आजोबांना तरी विचारायला हवे होते असे बिवलकर म्हणाले.
Navi Mumbai : घरांच्या घोटाळ्याच्या आरोपांबाबत बैठक; दैनिक नवराष्ट्रच्या पाठपुराव्याला यश
बिवलकर म्हणाले आमच्या जमिनीवर खोटे वारसदार उभे केले गेले. पुण्याच्या विकासकाला भेटा प्रश्न मिटवा अशा ऑफर दिल्या गेल्या. मी आर्किटेक्ट असल्याने जमिनीचे नियम माहीत आहेत. ही जागा वनविभागाची होती तर मग विमानतळ कसा केला गेला. वनविभागाची जागा असल्यास त्यावर झाडे लावावीत.इनाम स्वरूपात जमीन असल्याने आम्हाला शासनाचा कायदा लागू होत नाही हे सांगताना ज्येष्ठ नागरिक असल्या बिवलकरांना अश्रू अनावर झाले.
यावेळी ऍड. तन्वीर निझाम यांनी सांगितले की, लँड एजंट उर्मिष उधाणी यांच्यावर न्हावाशेवा व सीबीडी पोलीस ठाण्यात दोन, पनवेल शहर, उरण, वाशी, तळोजा, मुंबई कस्तुरबा मार्ग, सानपाडा, एलटी मार्ग मुंबई तसेच खान्देश्वर पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे. अशा १२ गुन्हे असलेल्या गुन्हेगारासोबत खुद्द शरद पवार यांनी जमिनीची पाहणी केल्याचा आरोप ऍड. निझाम यांनी केला.
सर्व्हे क्रमांक ५१ उलवे येथील जमीन बिवलकर यांच्या मालकीची आहे. त्याबाबतचा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. जमिनीच्या मोबदल्यात सिडकोने इतर कोणतीही किंवा साडेबारा टक्क्यातील जमीन दिलेली नाही. स.क्र.५१ व्यतिरिक्त इतर जमिनी वनखात्याकडे देण्यात आलेल्या नव्हत्या. सिडकोने बिवलकर यांची ४,०७८ एकर जमीन घेतली हे चुकीचे असल्याचे बिवलकर म्हणाले. यापैकी ३ हजार ते साडेतीन हजार एकर जमीन वनखात्याने १९७५ च्या कायद्यानुसार अवार्ड करून वनखात्याच्या ताब्यात घेतली आहे. तिचा सिडकोशी संबंध नसल्याचे बिवलकरांचे म्हणणे आहे. १९८७ साली कोर्ट ऑफ वॉर्डमधील इस्टेट मुक्त करण्यात आली. उलवे सर्व्हे क्रमांक ५१ चा तो ठराव आहे. मुंबई उच्च न्यायालयात निकाल बिवलकर कुटुंबाच्या बाजूने लागला आहे. सर्वोच्च न्यायालयात खटला प्रलंबित आहे.