भीमसैनिकांची प्रतीक्षा लवकरच संपणार!
एकूण खर्च १०९० कोटी रुपयांपर्यंत
या स्मारकाचे काम एप्रिल २०१३ मध्ये सुरू झाले असून, ते डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची ‘विशेष नियोजन प्राधिकरण’ म्हणून नियुक्ती करण्यात आली असून प्रकल्पाचा एकूण खर्च १०९० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. सदर स्मारक लोकांकरीता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांप्रती आदरांजली असेल.
स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा उंच पुतळा
नियोजित स्मारकाचे ११ ऑक्टोबर २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते . हे स्मारक अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टी या स्मारकापेक्षा उंच दिसणार आहे. स्मारकात १३७.३ मीटर (४५० फूट) उंच पुतळा उभारला जाणार असून ज्याचे बांधकाम मे २०२६ पर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे व्यक्तिमत्व प्रतिबिंबीत होऊ शकेल यासाठी संपूर्ण जागेची “बगीचे असलेले शांती स्थळ ” म्हणून कल्पना करण्यात आली आहे. स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कांस्य धातूने आच्छादीत पुतळयाची उंची 350 फुटाऐवजी (250 फूट उंच पुतळा + 100 फुट उंच पादपीठ) 450 फूट (350 फूट + 100 फूट उंच पादपीठ) असणार आहे.
स्मारकातील प्रमुख आकर्षणे
पादपीठामध्ये बौद्ध वास्तुरचना शैलीतील घुमट व पुतळयाच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठी चक्राकार उतरंड (spiral ramp) आहे. या व्यतिरिक्त सुमारे 1000 आसनक्षमता असलेले प्रेक्षागृह, प्रदर्शनाकरीता दालने, संशोधन केंद्र, ग्रंथालय, ध्यानधारणा केंद्र, परीक्रमा पथ, स्मरणिका विक्री केंद्र, प्रतिक्षालय, उपहार गृह, प्रशासकीय कार्यालय, स्वच्छतागृह, बगिचे, वाहनतळ इत्यादींचा स्मारकामध्ये समावेश आहे. हे स्मारक केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी प्रेरणा देणारे ठरेल असे उद्दिष्ट सरकारचे आहे.
भीमसैनिकांची प्रतीक्षा लवकरच संपणार!
स्मारकाचे एकूण ८५ टक्के काम पूर्ण झाले असून डॉ आंबेडकरांच्या पुतळ्याचे काही भाग मुंबईत दाखल झाले आहेत लवकरच म्हणजे डिसेंबर २०२६ पर्यंत काम पूर्ण होऊन स्मारकाचे अनावरण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ६ डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमी येथे देशाच्या काना कोपर्यातून दर्शनासाठी येणारे भीमसैनिक इंदू मिल येथील डॉक्टर आंबेडकरांचे भव्य स्मारक बघण्याकरिता कायम आतुर असतात आणि नेहमीच प्रयत्नशील असतात. पुढील वर्षी त्यांची हि प्रतीक्षा संपेल आणि त्यांना भव्य दिव्य अशा डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे दर्शन घडेल हि अपेक्षा.
हे देखील वाचा: हिंदू म्हणजे कोण? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे उत्तर वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल






