हिंदू म्हणजे कोण? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे उत्तर वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल
जसे 150 वर्ष जुनी इंग्रजांची सत्ता मोडणे महत्वाचे होते. तसेच कित्येक वर्षांपासूनची समाजातील जातीय विषमता देखील मोडणे महत्वाचे होते. हीच जातीय विषमता मोडण्याचा पहिला प्रयत्न केला तो महात्मा जोतिबा फुले यांनी. पुढे काही वर्षानंतर एक प्रचंड अभ्यासू आणि दूरदृष्टी असणारं व्यक्तिमत्व या महाराष्ट्राच्या मातीला लाभलं. ते व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य हे अफाट आहे. आपल्या 65 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी 32 शैक्षणिक डिग्री घेतल्या, अनेक क्रांतिकारी आंदोलनं केली, स्वतंत्र भारताचे ते पहिले कायदेमंत्री झाले, आणि असे अनेक महत्वाचे योगदान त्यांनी भारताला दिले. पण आजही अनेक जण डॉ. आंबेडकरांचे कार्य हे एका समाजापुरतेच आहे असे मानतात. म्हणूनच आज आपण त्यांनी लिहिलेल्या हिंदू कोड बिल आणि त्यात दिलेल्या हिंदू म्हणजे कोण? या प्रश्नाच्या उत्तराबद्दल जाणून घेणार आहोत.
खरंतर भारतीय समाजव्यवस्थेत स्त्रियांना हवे तेवढे स्वातंत्र्य नव्हतेच. यामुळे त्या कायमच जखडलेल्या असायच्या. बालपणी वडिलांच्या, तरुणपणी पतीच्या आणि म्हातारपणी मुलांच्या आधारावर त्यांना राहावे लागे. या समाजव्यवस्थेमुळे स्त्रियांची होणारी घुसमट बाबासाहेबांना सलत होती. आणि म्हणूनच त्यांनी हिंदू कोड बिल लिहिण्याचे ठरवले. 1947 साली हे हिंदी कोड बिल लिहिण्यास आंबेडकरांनी सुरुवात केली, जे पूर्ण होण्यास 4 वर्ष 1 महिना आणि 26 दिवस लागले. स्त्रियांना समान हक्क, दर्जा आणि प्रतिष्ठा मिळावी हेच या हिंदू कोड बिलमागचे खरे उद्दिष्ट होते.
या हिंदू कोड बिलात सात वेगवेगळे घटक होते. ज्यातील फक्त चारच हिंदू कायदे मंजूर झाले. या बिलात आंबेडकरांनी स्त्रियांना संपत्तीमध्ये समान वाटा मिळावा ही क्रांतिकारी तरतूद करून ठेवली. पण काही सनातनी संघटनांनी या बिलास विरोध करण्यास सुरुवात केली. त्यांना स्त्रियांना मिळणारा सामान हक्क कदाचित मान्य नसावा. हिंदू धर्मावर आक्रमण अशा शब्दात त्यांनी या हिंदू कोड बिलावर टीका केली. यानंतर मात्र बाबासाहेबांनी 27 सप्टेंबर 1951 रोजी आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. पण हे बिल बनवताना त्यांनी घेतलेले कष्ट व्यर्थ गेले नाही. अखेर 1955-56 मध्ये चार हिंदू कायदे मंजूर झाले. यात हिंदू विवाह कायदा, हिंदू वारसाहक्क कायदा, हिंदू अज्ञान व पालकत्व कायदा, आणि हिंदू दत्तक व पोटगी कायदा यांचा समावेश आहे
हिंदू कोड बिलाच्या सुरवातीलाच हिंदू म्हणजे कोण? या प्रश्नाचे उत्तर आंबेडकरांनी दिले आहे. ते म्हणतात, जो व्यक्ती मुस्लिम, ख्रिश्चन आणि पारशी आहे ती व्यक्ती हिंदू नाही. ही सरळ, साधी आणि सोपी व्याख्या आंबेडकरांनी केली. आणि यातून हे देखील अधोरेखित केले की शीख, बौद्ध, जैन हेसुद्धा हिंदू समाजाचेच घटक आहेत. यावरून समजते की आंबेडकरांना हिंदू समाजाची आणि त्यातही स्त्रियांची खूप काळजी होती.