धक्कादायक! 200 जीर्ण इमारतींना धोका, मनुष्यबळाचा प्रश्न कायम
अतिवृष्टी झाल्यास शहरातील अनेक भाग पाण्याखाली येतात. या पूरपरिस्थतीशी निपटण्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन व आपातकालीन सेवा विभागाने प्लान तयार केला आहे. शहरातील 200 जीर्ण इमारती असून या सर्वांना नोटीस बजावण्यात आल्याचे या प्लानमध्ये नमुद असून त्यांना नोटीस देण्यात आले आहेत. यात दहाही झोनमध्ये आरामशीन, पाणी काढणारे पंप, वाहन आदींची संख्या पुरेसी दिसत असली तरी अग्निशमन विभाग व आपातकालीन सेवा विभागातील 350 पदांची भरती गेल्या वर्षभरापासून रखडल्याने मनुष्यबळाबाबत पेच कायम इतर विभागाकडे कर्मचाऱ्यांची मागणी आहे.
त्यामुळे अतिवृष्टी होऊन पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास महापालिका कशी लढणार, असा प्रश्न कायम आहे. एकाचवेळी शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी साचल्यास व जीर्ण इमारतीतील नागरिकांचा जीव धोक्यात आल्यास तेथील लोकांना कसे बाहेर काढणार, अशा संकटाच्या काळात महापालिकेच्या इतर विभागातील कर्मचारी कितपत कामात येणार, असे अनेक प्रश्न यानिमित्त उभे झाले आहे.
महापालिकेचा अग्निशमन व आपातकालीन सेवा विभाग दरवर्षी परिस्थीतीशी निपटण्यासाठी नियोजन तयार करते. यंदा 2025 चे नियोजनही तयार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे कागदावर हे नियोजन भक्कम दिसत असले तरी मनुष्यबळा अभावी अंमलबजावणी अशक्य आहे. याची जाणीव अधिकाऱ्यांनाही आहे. परंतु राज्य शासनाकडे वर्षभरापासून 350 पदांच्या भरतीची फाईल रखडली असल्याने त्यांच्यापुढेही प्रश्न आहे.
अग्निशमन व आपात्कालीन विभागाचे आस्थापनेवर 13 अग्निशमन केंद्र आहेत. याकरिता 872 पदांचा आकृतीबंध मंजूर आहे. सध्या 9 अग्निशमन केंद्र कार्यरत आहेत. त्यामुध्ये 611 पदे अनुज्ञेय ठरतात. सध्या वेगवेगळ्या संवर्गाचे 152 पदे कार्यरत आहेत. 459 पदे रिक्त असल्याने अग्निशमन विभागाला आगीसह इतर घटनांवर नियंत्रण ठेवण्यात अडथळे येत आहे. त्यामुळे 350 वेगवेगळ्या पदाची सरळसेवेची भरती प्रक्रिया प्रस्तावित केली. यासंदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर ही फाईल राज्य सरकारच्या नगर विकास विभागाकडे धूळखात पडली होती. मागील महिन्यात ही फाईल राज्यपालाकंडे गेली असल्याचे सुत्राने नमुद केले.
Rain Alert : सावधान! पुढचे 6 ते 7 दिवस तुफान पाऊस पडणार, महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना धोका
अग्निशमन व आपातकालीन सेवा विभागाने कागदावर तयार केलेले नियोजनात मनुष्यबळासाठी इतर विभागाच्या कर्मचा-यांचा उल्लेख करण्यात आला आहे. मनपाचा सार्वजनिक बांधकाम विभाग, नगररचना, अतिक्रमण विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग, जाहिरात विभाग, उद्यान विभाग, जलप्रदाय विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, विद्युत विभाग आपातकालीन स्थितीत मनुष्यबळ उपलब्ध करून देईल, असे म्हटले आहे. पावसाळ्यात हे विभाग वेगवेगळी जबाबदारी पार पाडणारच आहे. परंतु पुरात अडकलेल्यांना काढण्याचे प्रशिक्षण यांच्याकडे नाही. अग्निशमनचे जवान कमी पडल्यास हे कर्मचारी पूरपरिस्थिती कामात येण्याची शक्यता धूसर आहे. अशावेळी अग्निशमन व आपातकालीन सेवा विभागातील पदभरतीचा मुद्दा ऐरणीवर येणार आहे.