File Photo : Eknath Shinde
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. त्यातच शिवसेना फुटल्यानंतर मुख्यमंत्रिपद, त्यानंतर पक्षचिन्ह आणि नाव तसेच पाठोपाठ विधानसभेत मोठे यश यामुळे हुरूप चढलेल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने राज्यात पाय पसरण्यास सुरुवात केली. आता हा पक्ष राज्यभर फोडाफोडी करून पक्षप्रवेश करून घेत असल्याचे शिवसैनिकच जाहीर मंचावरून सांगत आहे. परंतु, त्यांना नागपूर जिल्ह्यात अपेक्षित पक्षप्रवेश न मिळाल्याने ‘दे धक्का’ फसल्याची जोरदार चर्चा आहे.
हेदेखील वाचा : राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांच्यात तीन महिन्यांत तीनवेळा भेटीगाठी; महापालिका निवडणूक एकत्र लढवणार?
गोंदिया वगळता शिंदे सेनेच्या जाळयात कोणताही मासा अडकला नाही. ‘दे धक्का’ या नावाने पक्षप्रवेश सोहळे करत शिंदे सेनेकडून सध्या राज्यभर आभार सभा सुरू आहेत. यातील एक सभा कन्हान येथेही झाली. तर, त्यापूर्वी मेळावे घेणे सुरू आहेत. गोंदियात काँग्रेसने पक्षातून हकालपट्टी केलेले माजी आमदार सहसराम करोटे आणि मोरगाव अर्जुनीतून राष्ट्रवादीने तिकीट नाकारलेले माजी आमदार मनोहर चंद्रीकापुरे हेच ते मोठे मासे शिंदे सेनेच्या गळाला लागले. मात्र, या दोघांचेही राजकीय भविष्य सध्या संकटात आहे.
गोरेगाव व मोरगाव अर्जुनी या दोन्ही मतदारसंघात पुढील काळात या दोघांनाही उमेदवारी मिळण्याची शक्यता कमीच आहे. पूर्व विदर्भाचा विचार केल्यास गडचिरोलीतून अहेरीच्या नगराध्यक्ष व सेलूच्या नगराध्यक्ष वगळता मोठे नाव नव्हते. नागपुरात मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर सरायकर, काँग्रेसचे सुमुख मिश्रा, ठाकरे गटाचे राजू हरणे ही तीन नावे आहेत. परंतु, हे तिन्ही मोठ्या राजकीय घडामोडीत चर्चेतील नावे नाहीत. हरणे यांचे नाव काटोल-नरखेडपुरतेच मर्यादित आहेत. मात्र, जो ‘धक्का’ शिंदे सेनेकडून अपेक्षित होता, तो दिला गेलाच नाही.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आक्रमकपणे पक्षप्रवेश घडवून आणले जात आहे. केवळ महाविकास आघाडीचेच नव्हे तर भाजपचेही माणसे घेतली जात आहेत. त्यामुळे पक्षपसारा वाढविण्याचा शिंदे सेनेचा नागपुरातील प्रयोग पाहिजे तेवढा यशस्वी झाल्याचे मानले जात आहे. खुद्द शिंदे सेनेतीलच अनेक शिवसैनिक या पक्षप्रवेशावर मौन बाळगून आहेत.
इकडचे फोडले, तिकडचेही…
शिंदे सेनेची पूर्व विदर्भाची कमान संघटक किरण पांडव यांच्याकडे आहे. त्यांच्याच नेतृत्वात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. प्रास्ताविकात त्यांनीच फोडाफोडीची भाषा केली. पक्षप्रवेश या शब्दापेक्षा फोडाफोडीची बाब पुढे करत गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, भंडारा व नागपूर येथे इतरांचे पक्ष कसे फोडले याची माहिती पांडव देत होते. यावरून पक्षप्रवेश केलेले स्वेच्छेने आले की सत्तेत असल्याने शिंदे गटात आले, याबद्दल शंकाकुशंका घेत आहेत.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics : “लक्षवेधी लावायला नीलम गोऱ्हे किती पैसे घेतात?” राजकीय वर्तुळात जोरदार आरोप प्रत्यारोप