आता अपघात होणारच नाहीत...! देवेंद्र फडणवीसांच्या झेब्रु शुभंकराचा अनावरण सोहळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, वाढत्या नागरीकरणामुळे वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. अपघात रोखण्यासाठी राज्य शासन रस्ता सुरक्षा जनजागृती मोहिमेतून नागरिकांना वाहतूक नियमांबाबत जागरूक करण्यात येत आहे. अपघात होणारच नाहीत, यासाठी नागरिकांना ‘ वाहतूक साक्षर’ करण्याचा शासनाचा मानस आहे. या मोहिमेची ही फलश्रुती असून विविध विभागांच्या माध्यमांतून अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळून रस्ता सुरक्षा मोहिमेत सहभाग घ्यावा. ‘ रस्ता सुरक्षा जीवन रक्षा’ हा मूलमंत्र अंगीकारावा, असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.
प्रास्ताविकात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, झेब्रु शुभंकर हा रस्ता सुरक्षेचा संदेश वाहक आहे. पहिला हक्क पादचाऱ्यांचा या जाणिवेतून रस्ता सुरक्षा मोहीम राबविण्यात येणार आहे. ‘ झेब्रु’ ला राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यात येणार आहे. झेब्रु रस्ता सुरक्षेचा जिवंत आत्मा ठरेल, या पद्धतीने मोहिमेची अंमलबजावणी करण्यात येईल. पदपथांवर असलेले अतिक्रमण काढून तेथील रेलिंग न काढण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाकडून नियमावली बनविण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार संबंधित विभागाकडून कार्यवाही करण्यात येईल. या कार्यक्रमात झेब्रु शुभंकरचे अनावरण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांना झेब्रु असलेले सन्मानचिन्ह देण्यात आले. कार्यक्रमाला परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
झेब्रु’ शुभंकरच्या माध्यमातून रस्ता सुरक्षा हा संदेश सहज, समजण्यासारखा आणि आकर्षक पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचे सर्व मान्यवरांनी अधोरेखित केले. विशेषतः युवक आणि विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षा संस्कृती रुजविण्यासाठी ‘झेब्रु’ हा उपक्रम महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, अशी अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली. समारोपात “सड़क सुरक्षा -जीवन रक्षा” हा संदेश पुन्हा अधोरेखित करत रस्ता सुरक्षा ही केवळ सरकारी मोहीम नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे आवर्जून सांगण्यात आले.






