संग्रहित फोटो : नाना पटोले
मुंबई : राज्यातील नव्या सरकारबद्दल जनतेच्या मनात संभ्रम असून हे सरकार आपल्या मताचे नाही ही जनभावना राज्यात तीव्र बनली आहे. मारकडवाडीतच नाही तर राज्यातील प्रत्येक गावाची हीच भावना आहे. बॅलेट पेपरवरच मतदान घ्यावे, अशी मागणी जनतेतूनच जोर धरत असून, ग्रामसभा तसे ठराव पास करत आहेत. निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालय या दोन संस्थांनी या जनभावनेची दखल घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, माझे मत मी दिलेल्या उमेदवारालाच जाते का, यावर जर मतदारांना शंका असेल तर त्याचे समाधान झाले पाहिजे. मारकडवाडीतील लोकांनी बॅलेटपेपरवरील मतदानासाठी मॉक पोलिंग घेण्याचा निर्धार केला होता पण निवडणूक आयोग, पोलीस प्रशासनाच्या मदतीने सरकारने त्यांची मुस्कटदाबी केली, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. ७६ लाख मते कशी वाढली, याचे उत्तर निवडणूक आयोगाला द्यावे लागेल पण ते समाधानकारक उत्तर देत नाहीत. मतांची चोरी करणे हा लोकशाहीचा दिवसाढवळ्या केलेला खून आहे. लोकशाहीमध्ये अशा प्रकारे असंतोष निर्माण झाला असेल तर त्याची दखल घ्यावीच लागेल. विरोधी पक्ष या नात्याने आम्ही सभागृहात व रस्त्यावर जनतेच्या या मागणीसाठी लढू, असे पटोले म्हणाले.
हे सुद्धा वाचा : पराभवानंतर महाविकास आघाडीचा मोठा निर्णय; नाना पटोलेंनी दिली सविस्तर माहिती
सरकारने विधिमंडळाची परंपरा पाळावी…
विधानसभा अध्यक्षपद बिनविरोध करणे तसेच उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला देणे ही महाराष्ट्राच्या विधिमंडळाची परंपरा आहे. दिल्ली विधानसभेत भाजपाचे फक्त तीन सदस्य असतानाही आम आदमी पक्षाने भाजपाला विरोधी पक्षनेतेपद दिले. मविआच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महाविकास आघाडीला विरोधी पक्ष नेते पद देण्यासंदर्भात चर्चा केली. सरकार त्यावर सकारात्मक विचार करेल अशी अपेक्षा आहे, असे नाना पटोले म्हणाले.
मारकडवाडी गाव चर्चेत
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यामध्ये जोरदार राजकारण रंगले. मात्र सोलापूरमधील मारकडवाडीमध्ये ईव्हीएमद्वारे पार पडलेल्या मतदानावर संशय व्यक्त करण्यात आला होता. गावाने केलेल्या मतदानात आणि लागलेल्या निकालात तफावत आढळून येत आहे. त्यामुळे संपूर्ण गावाने आपल्या खात्रीसाठी पुन्हा एकदा मतदान घ्यायचे ठरवले होते. विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतमोजणीवर शंका घेत मारकडवाडी गावातील काही ग्रामस्थांनी आपल्या गावापुरते फेर मतदान घेण्याचा घाट घातला होता. याला पोलीस प्रशासनाकडून जोरदार विरोध करण्यात आला होता. गावात मतदान होऊ नये यासाठी गावात 144 कलम लावण्यात आले होते. आता या प्रकरणातील संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.