सौजन्य - नवराष्ट्र टीम
मुंबई : बीड हत्या व परभणी अत्याचार प्रकरणामुळे राज्यामध्ये वातावरण तापले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. परभणी व बीडमधील घटनांवर सर्व स्तरातून कारवाईची मागणी केली जात असताना भाजपा युती सरकार मात्र गंभीर नसल्याचे दिसत आहे. सरकार कारवाईची भाषा करत असले तरी सरकार वस्तुस्थिती मान्य करायला तयार नाही, त्यामुळे चौकशीतून उत्तर काय मिळणार हे माहित आहे, असे सांगून बीड व परभणी हत्या प्रकरण दाबण्याचा मुख्यमंत्र्यांकडून प्रयत्न होत असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या दोन दिवसांच्या नव सत्याग्रह कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बेळगावात पोहचले असताना प्रसार माध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, परभणीत आंबेडकरी विचाराच्या सुशिक्षित तरुणाचा पोलीस मारहाणीत झालेला मृत्यू हा पोलीसांनी केलेली हत्याच आहे. बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची निघृण हत्या केली, या दोन्ही घटनांवर जनतेने व सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी वस्तुस्थिती मांडली आहे पण भाजपा युती सरकार ते मान्य करत नाही, हे सरकार प्रायोजित असल्याने सीआयडी चौकशी केली तरी त्यातून काही निष्पन्न होणार नाही.
देशात हुकूमशाही सुरु असून, सध्या देशात काय चालले आहे हाच प्रश्न सर्वांनाच पडला आहे. देशातील या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात होत असलेले अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन हे काँग्रेस पक्षासाठी तसेच देशवासीयांसाठी अत्यंत महत्वाचे आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
हे सुद्धा वाचा : महाराष्ट्र हादरला! मद्यधुंद पोलिसाचा 5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, घटनेने संताप
आरोपी अजूनही मोकाट
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला तब्बल 15 दिवसांचा कालावधी संपवून मुख्य आरोपी अजूनही मोकाट आहेत. बीड पोलिस आणि सीआयडीला सुद्धा फरार आरोपी सापडत नसल्याचे चित्र आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमध्ये आक्रोश सुरु असतानाच राज्यातही संतापाची लाट आहे. खंडणी मारामारी आणि दहशत माजवण्याचे आरोप होत असलेल्या आणि देशमुख यांच्या निर्घृण हत्येमध्येही सर्वाधिक आरोप होत असलेला वाल्मिक कराडचं काय झालं? याबाबतही कोणतीच माहिती समोर आलेली नाही. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा अत्यंत निकटवर्तीय मानला जातो. पवनचक्की दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड आरोपी असून यामधील एक आरोपी विष्णू चाटेला अटक करण्यात आली असली, तरी वाल्मिक कराडपर्यंत पोलिस पोहोचलेले नाहीत. सुदर्शन घुले हा खंडणीमधील सुद्धा आरोपी आहे.