लोकल बॉडी इलेक्शनमुळे आठ वर्षानंतर नगरसेवक वॉर्डमध्ये अवतरले आहेत (फोटो - सोशल मीडिया)
Local Body Elections : नांदेड : निवडणूक जाहीर होताच शहरात एक अद्भुत वातावरण निर्माण झाले आहे. वर्षानुवर्षे न दिसलेले नगरसेवक अचानक अवतरले आहेत. काहीजण रस्त्यावरील खड्यांत उभे राहून फोटो काढत आहेत, तर काहीजण ड्रेनेजच्या दुर्गंधीतून “विकासाचा वास” शोधत फिरत आहेत. नागरिक मात्र विचारात पडले आहेत- हेच का ते लोक, जे पाच वर्षे फोनही उचलत नव्हते ? अनेक नगरसेवक तब्बल आठ वर्षानंतर प्रभागातील महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने अवतरले आहेत. इतक्या दिवस कोणत्या विषयाची साधना ते करत होते हे त्यांनाच ठाऊक.
शहरातील मूलभूत नागरी प्रश्न आज राजकीय व्यंगाचे जिवंत व्यासपीठ बनले आहेत. आठवड्यातून एखाद-दोन वेळा येणारे पाणी, तेही कमी दाबाने; पण पाणीपट्टी मात्र वेळेवर! यावर एका संतप्त नागरिकाने थेट प्रचार रॅलीतच प्रश्न विचारला “साहेब, पाणी कमी येते, पण बिल मात्र फुल प्रेशरने येते; हे कोणते मॉडेल आहे?” प्रश्न ऐकून उमेदवार क्षणभर गडबडले, मग हसत म्हणाले, “निवडून या, सगळं बदलू !” गर्दीतून आवाज आला- “मागच्या वेळेसही हेच ऐकलं होतं!
हे देखील वाचा : “माझी लढाई मुस्लिमांशी नाही…; बुरखा घातलेली महिला मुंबईची महापौर होण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले
तीन, चार टर्म नगरसेवक
अनेक प्रभागात तीन चार टर्म नगरसेवक सातत्याने पुन्हा पुन्हा निवडणुकीला उभा राहतात व निवडणुका जिंकण्याचे तंत्र त्यांना ठाऊक असल्यामुळे सहजपणे निवडून येतात. त्यानंतर मात्र ते अदृश्य होतात. मतदारांना मात्र अदृश्य विकास शोधावा लागतो. ड्रेनेजची अवस्था तर स्वतंत्र नाट्य ठरली आहे. प्रचार फेरीदरम्यान एका नेत्याचा बूट चुकून उघड्या नाल्यात अडकला. समर्थकांनी मोठ्या प्रयत्नाने बूट बाहेर काढला; पण नागरिकांनी लगेच टोला लगावला – “बूट बाहेर आला, पण शहराला कधी नाल्यातून बाहेर काढणार?”
‘ड्रेनेज दर्शन यात्रा’ हा नवा शब्दप्रयोग
हा प्रसंग सोशल मीडियावर व्हायरल होताच ‘ड्रेनेज दर्शन यात्रा’ हा नवा शब्दप्रयोग चर्चेत आला. रस्त्यांची स्थिती पाहता, खड्डे की रस्ते हा प्रश्नच पडतो. काही ठिकाणी खड्यांभोवती रस्ते आहेत, अशी उपहासात्मक टीका नागरिक करत आहेत. रात्री स्ट्रीट लाईट नसल्याने अपघात होतात, पण दिवसा मात्र उमेदवारांचे पोस्टर झगमगतात. “लाईट पोस्टरला आहे, रस्त्याला नाही,” अशी उपरोधिक टिप्पणी एका ज्येष्ठ नागरिकाने केली. कचरा व्यवस्थापनाबाबतही परिस्थिती विनोदी आणि विदारक आहे. मोकळ्या प्लॉटमध्ये कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी आणि त्याच ठिकाणी प्रचार सभा ! एका सभेत
हे देखील वाचा : भाजपच्या ‘मिशन 125’ ला अजितदादांचा ‘खो’; धास्तावलेल्या मुख्यमंत्र्यांकडून पुण्यातील बड्या नेत्यांची कानउघडणी !
दुर्गंधी असह्य झाल्याने उमेदवारांनी भाषण अर्धवट सोडले. नागरिक म्हणाले, “हे भाषण नव्हतं, तर वास्तवाचा वास होता.” आरोग्य, शिक्षण, महिलांसाठी सुविधा-या सगळ्या गोष्टी जाहीरनाम्यात आहेत; पण प्रत्यक्षात मात्र अदृश्य. नगरसेवकांची आठवण नागरिकांना निवडणुकीपुरतीच येते. यंदा मात्र मतदारांचा सूर बदललेला आहे. “फोटो, फ्लेक्स आणि आश्वासनांचा साठा नको; कामाचा हिशेब द्या,” अशी ठाम भूमिका घेत मतदार नगरसेवकांना खऱ्या अर्थाने ‘धडा’ शिकवण्याच्या तयारीत असल्याचे चित्र शहरभर दिसत आहे.
सभेला गर्दी जमवण्याचे एजन्सीचे काम
महानगरपालिकेच्या निवडणुका नागरी प्रश्नांवर लढविण्याच्या ऐवजी रंगाच्या व अस्मितेच्या नावाने लढविल्या जात आहेत. आरोप प्रत्यारोप व सामाजिक ध्रुवीकरण करून निवडणुका जिंकण्याचे तंत्र काही नगरसेवकांनी सहजरित्या साध्य केलेले आहे. निवडणुकीच्या धामधुमीमध्ये त्यांना सिझनल कार्यकर्ते मिळतात, तसेच राजकीय नेत्यांच्या सभेला जी हंगामी गर्दी गोळा करावी लागते त्यासाठी काही राजकीय कार्यकर्ते व नेते गर्दी जमवण्याची एजन्सी म्हणून काम करत आहेत. निवडणूक म्हणजे उत्सव असतो, असे म्हणतात; पण यावेळी तो उपहासाचा आरसा ठरत असून, त्या आरशात नगरसेवकांना स्वतःचे अपूर्ण प्रतिबिंब स्पष्टपणे दिसू लागले आहे.






