दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागांतर्गत आरपीएफने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना केल्या आहेत (फोटो - सोशल मीडिया)
Railway News : नांदेड : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागांतर्गत रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) सन २०२५ मध्ये सुरक्षा, दक्षता व मानवतावादी सेवेत उल्लेखनीय कामगिरी करत प्रवाशांचा विश्वास अधिक दृढ केला आहे. “सेवा हेच कर्तव्य” या ब्रीदवाक्याला अनुसरून आरपीएफने केवळ रेल्वे मालमत्ता व प्रवाशांची सुरक्षा राखली नाही, तर संवेदनशीलता व तत्परतेतून सामाजिक जबाबदारीही प्रभावीपणे पार पाडली आहे. रेल्वे प्रवासादरम्यान चोरी, मानवी तस्करी, आत्महत्येचे प्रयत्न, अमली पदार्थांची तस्करी व इतर गुन्हेगारी प्रकार रोखण्यासाठी नांदेड विभागात विविध विशेष मोहिमा राबविण्यात आल्या आहेत.
ऑपरेशन अमानत:
प्रवासादरम्यान नकळत मागे राहिलेला मौल्यवान ऐवज आरपीएफने सुरक्षितपणे जप्त करून कायदेशीर मालकांना परत केला. वर्षभरात९८ प्रवाशांचा सुमारे २५.६५ लाख किमतीचा ऐवज त्यांना सुपूर्द करण्यात आला.
ऑपरेशन नन्हे फरिश्ते:
स्थानकांवर व गाड्यांमध्ये कुटुंबापासून वेगळे झालेल्या ५५ मुलांना (४१मुले व १४ मुली) शोधून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करत त्यांच्या कुटुंबीयांशी सुरक्षितपणे पुनर्मिलन घडवून आणले.
हे देखील वाचा : आठ वर्षांनी अवतरले राजकीय नेते! समस्यांच्या याद्या वाचून मतदारांनी जागेवरच टोकले
ऑपरेशन डिग्निटी:
विविध कारणांमुळे कुटुंबापासून दूर झालेल्या १७ व्यक्त्तींना शोधून त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले, ज्यामुळे अनेक कुटुंबे पुन्हा एकत्र आली.
ऑपरेशन मातृशक्ती :
आपत्कालीन परिस्थितीत गर्भवती महिला प्रवाशांना मदत करण्यात आली. प्रवासादरम्यान एका महिलेच्या सुरक्षित प्रसूतीसाठी आरपीएफने मोलाची भूमिका बजावली. हा उपक्रम गर्भवती महिलांच्या सुरक्षिततेसाठी आरपीएफची वचनबद्धता दर्शवतो.
ऑपरेशन रेल सुरक्षा
रेल्वे मालमतेच्या संरक्षणासाठी ३३ प्रकरणांत ६६ आरोपींना अटक करण्यात आली. तसेच तिकीट काळाबाजाराशी संबंधित १८ प्रकरणांत १९ आरोपीवर कायदेशीर कारवाई झाली.
ऑपरेशन समय पालन:
बेकायदेशीर साखळी खेचून गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत करणा-यांविरुद्ध कठोर कारवाई करत ५१३ गुन्हेगारांना अटक करण्यात आली.
हे देखील वाचा : निवडणूक रणधुमाळीला वेग ! नांदेडमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांसह भाजप पक्षश्रेष्ठींच्या सभा
अनधिकृत कृत्यांवर कारवाई:
२०२५ मध्ये १८७२ अनधिकृत फेरीवाले, ८०४ रेल्वे पटरी ओलांडणारे व १२५ इतर अनधिकृत गुन्हेगारांवर रेल्वे कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली.
ऑपरेशन प्रवासी सुरक्षा :
प्रवाशांच्या सामान चोरी प्रकरणी १०७ आरोपींना अटक करून पुढील कारवाईसाठी शासकीय रेल्वे पोलिसांच्या (GRP) ताब्यात देण्यात आले.
ऑपरेशन जनजागृती
कायदा अमलबजावणीपलीकडे जाऊन आरपीएफने सामाजिक जनजागृतीवर भर दिला. ग्रामस्थ, सरपंच व लोकप्रतिनिधींसोबत बैठका घेऊन दगडफेक प्रतिबंध, महिला सुरक्षा व मानवी तस्करीविरोधात जनजागृती मोहीम राबविण्यात आली. नांदेड विभागातील रेल्वे सुरक्षा दलाची ही कामगिरी प्रवाशांच्या सुरक्षिततेसह मानवतावादी सेवेचा आदर्श ठरत असून भविष्यातही अशीच कार्यतत्परता कायम राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.






